मुंबई - महाविकास आघाडीच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू धरुन महाविकास आघाडी स्थापन केली. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार... या आपल्या वाक्यावर ठाम राहत, अखेर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी करुन दाखवलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती विराजमान झाली. या सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांना पाहिला मिळाला होता.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शायरीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांना टोले लगावत होते. भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे ठासून सांगत होते. अखेर, ठरवल्याप्रमाणे राज्यात 104 जागांवर विजय मिळवूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर, राऊत यांचा शायराना अंदाज कमी झाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा राऊत यांनी एक शेर आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में...पर बेवजह खुश रहने का मजा ही और है..!!
असा शेर राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांनी या शायरीतून नेमकं कुणाला टोला लगावला आहे, हे अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र, नेहमीप्रमाणेच आपण खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय. या खुशीतच मोठा आनंद असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीयु राजकारणात जावे, अशा शुभेच्छा देतानाच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या कायमच शुभेच्छा आहेत, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.