आम्ही मागणारे नाही, देणारे! नाराजीनाट्याच्या चर्चेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 08:33 PM2019-12-30T20:33:37+5:302019-12-30T20:35:31+5:30
खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त आले होते.
मुंबई - राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा बराच काळ रखडलेला शपथविधी अखेर आज झाला. या शपथविधीनंतर सरकारस्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपल्या कुटुंबात कुणीही नाराज नाही, आम्ही काहीही मागणी केली नव्हती. आम्ही मागणारे नव्हे तर पक्षाला योगदान देणारे आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शिवसेनेकडून जाहिर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुनिल राऊत यांना स्थान नसल्याचे समोर आल्यानंतर सुनील राऊत हे नाराज झाल्याचे वृत्त पसरले. तसेच या नाराजीमुळेच संजय राऊत हे शपथविधीला अनुपस्थित राहिले, अशी चर्चा रंगली होती. मात्र नाराजीचे हे वृत्त संजय राऊत यांनी खोडून काढले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ''आम्ही पक्षाकडे काहीही मागणी केली नव्हती. आम्ही आम्ही मागणारे नव्हे तर पक्षाला योगदान देणारे आहोत. माझे बंधू सुनील राऊत हे आमदार आहेत. त्यांनीसुद्धा मंत्रिपद मागितले नव्हते. काही लोक अशा प्रकारच्या अफवा परसवरत असतात,''
दरम्यान, ''हे सरकार तीन पक्षांच्या आघाडीचे आहे. त्यामुळे आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. तिन्ही पक्षात दिग्गज मंडळी आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील लोकांनी धीर घरला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे.'' असेही संजय राऊत यांनी सांगितले.
Shiv Sena's Sanjay Raut on #MaharashtraCabinetExpansion: People should understand that we don't have many options since it's a govt of 3 parties,there are capable people in all 3 parties.Our people must stay a little patient. It's a matter of happiness that Uddhav Thackeray is CM pic.twitter.com/iPZzkc7R5m
— ANI (@ANI) December 30, 2019