सुषमा अंधारेंना टोला लगावत शिरसाटांची एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 05:34 PM2023-06-01T17:34:57+5:302023-06-01T17:36:31+5:30
मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढण्यात आले. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती. याप्रकरणी संजय शिरसाट यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर, आता सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच चॅलेंज दिलं आहे. देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून तरी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे अंधारे यांनी म्हटले. तर, याप्रकरणी शिरसाट यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावत, जास्तीची प्रतिक्रिया देणं टाळलं.
मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढण्यात आले. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असे सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावरील तक्रारींसदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर म्हटले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारची बाजू घेतील. पण, मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे. त्यांनी वकील म्हणून उत्तरं द्यावीत, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर, संजय शिरसाट यांनी यावर न बोललेलंच बरं, असे म्हणत सुषमा अंधारेंना टोलाही लगावला.
सुषमा अंधारे या मोठ्या एक्टर आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं, असे म्हणत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
माझी लढाई सुरुच ठेवणार
देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहात, संजय शिरसाट प्रकरणात जी चौकशी समिती नेमली त्याबद्दल काय माहिती आहे का? छत्रपती संभाजीनगर प्रकरणात त्या आमदाराला क्लीन चिट दिली, असे सांगितले आहे. ही क्लीन चीट कशी दिली गेली, याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच महिलांना ट्रोल करण्यात त्यांना फार मोठी मर्दगिरी वाटते. फडणवीसांनी तुम्ही त्यांना काय समज द्याल का? गृहमंत्री म्हणून तुम्हीच उत्तर दिली पाहिजेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. दरम्यान, हा फक्त ट्रेलर आहे. मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार आहे.