Join us  

संजय तुर्डेंची प्रकृती चिंताजनक

By admin | Published: February 25, 2017 4:50 AM

मनसेच्या विजयावर संशय घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या निर्णयानंतर मनसे उमेदवारावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मनसे उमेदवार संजय तुर्डे यांच्यासह सात जखमी झाले

मुंबई : मनसेच्या विजयावर संशय घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या निर्णयानंतर मनसे उमेदवारावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मनसे उमेदवार संजय तुर्डे यांच्यासह सात जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजपा उमेदवार सुधीर खातू यांच्यासह सात जणांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शुक्रवारी अटक केली आहे. घटनेमुळे कालिना परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.एल वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६६ मध्ये भाजपाचे सुधीर खातू आणि मनसेचे संजय तुर्डे यांच्यात चुरशीची लढत होती. दोघेही व्यावसायिक आहेत. खातू यांना त्यांच्या विजयाची निश्चिती होती. त्या तयारीतच ते आले होते. अशात मतमोजणीत तुरडेंच्या बाजूने कौल गेल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तब्बल १ हजाराहून अधिक मतांनी तुरडेंनी खातूंना धोबीपछाड दिला. याच रागात विजयाचा जल्लोष करत घरी परतत असलेल्या तुरडेंवर खातूंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेव्हर ब्लॉक, तलवारी, लाकडी बांबूने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात तुरडेंसह त्यांचे सहा ते सात कार्यकर्ते जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या विनोबा भावे नगर पोलिसांना या ठिकाणी कर्फ्यू लावण्याची वेळ ओढावली. मध्यरात्री उशिरापर्यंत येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. तुरडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनिष येलकर, स्वप्निल जगताप, प्रवीण जाधव, शैलेश आसोलकर यांच्यासह आणखीन पाच ते सहा जण यात जखमी आहेत. यामध्ये तुरडेंची प्रकृती चिंताजनक आहे.