संजीव जयस्वाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड, ईडीच्या तपासात १०० कोटींची स्थावर मालमत्ता अन् बरेच काही उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:27 AM2023-06-24T06:27:26+5:302023-06-24T06:27:42+5:30

 ईडीच्या पथकाने जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून १३ लाख रुपये रोख व मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत.

Sanjeev Jaiswal has crores of rupees, real estate worth 100 crores and much more revealed in ED probe | संजीव जयस्वाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड, ईडीच्या तपासात १०० कोटींची स्थावर मालमत्ता अन् बरेच काही उघड

संजीव जयस्वाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड, ईडीच्या तपासात १०० कोटींची स्थावर मालमत्ता अन् बरेच काही उघड

googlenewsNext

मुंबई : कोविड केंद्रांच्या उभारणीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि म्हाडाचे विद्यमान उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे तब्बल १०० कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याचे समजते. त्याबरोबरच जयस्वाल यांच्या पत्नीच्या नावे १५ कोटींच्या मुदत ठेवी (एफडी) असल्याचेही आढळून आले आहे. 

 ईडीच्या पथकाने जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून १३ लाख रुपये रोख व मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. २४ स्थावर मालमत्तांची माहितीही ईडीच्या हाती लागली असून त्यांची किंमत १०० कोटींहून अधिक आहे. यामध्ये, मढ आयलंडमधील अर्धा एकर जमिनीचा समावेश आहे. यासंदर्भात जयस्वाल यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. चौकशीला हजर राहण्यास जयस्वाल यांनी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार, जयस्वाल यांची भूमिका महत्त्वाची आहे.

नेमकी किती मालमत्ता? 
३४ कोटींची मालमत्ता असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. त्यात वडिलोपार्जित मालमत्तांबरोबरच सासरच्या मंडळींनी पत्नीला १५ कोटींच्या एफडी भेट दिल्याचा समावेश आहे. बाजारभावामुळे स्थावर मालमत्तेची किंमत १०० कोटींहून अधिक झाल्याचेही जयस्वाल यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

सूरज चव्हाण यांना समन्स 
सूरज चव्हाण यांना १७ तासांच्या चौकशीनंतर पुन्हा समन्स बजावत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण चार जणांना समन्स बजावत, सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीला हाती लागलेल्या विविध कागदपत्रांच्या आधारे त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, जयस्वालही सोमवारी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे

किशोरी पेडणेकरही रडारवर : या कथित घोटाळ्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. पेडणेकर यांना बहुतांश अनियमिततेची माहिती असल्याचा संशय असून, त्यांनी विशिष्ट संस्थांना पुरवठा करार मंजूर करण्याच्या सूचनाही दिल्या. 

१२ तक्रारी 
कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे १२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी 
आणि राजकीय वर्तुळातील लोकांचा समावेश आहे. 
तक्रारदारांपैकी काही नागरिक आहेत, तर 
काही संशयितांचे प्रतिस्पर्धी आहेत. 
कोविड जंबो सेंटर्स घोटाळ्याचे तपशील शेअर करण्यासोबतच, तक्रारींमध्ये इतर घोटाळ्यांचा तपशीलही देण्यात आला आहे. त्यानुसारही अधिक तपास सुरू आहे.

आतापर्यंत काय कारवाई?
ईडीने पालिका अधिकारी, मध्यस्थ, पुरवठादार आणि कंत्राटदार यांचे १२ मोबाइल जप्त केले आहेत. 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची भागीदारी असलेल्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांचे व्हॉट्सॲप चॅटमधून महत्त्वाचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. 
घोटाळ्याशी संबंध असलेल्या प्रमुख संशयितांना पुढील आठवड्यापासून चौकशीला पाचारण करण्यात येणार आहे. 

Web Title: Sanjeev Jaiswal has crores of rupees, real estate worth 100 crores and much more revealed in ED probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.