संजीव पालांडेचे निलंबन अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:28+5:302021-06-28T04:06:28+5:30
मुंबई : भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या माजी गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व ...
मुंबई : भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या माजी गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या पालांडे यांचे निलंबन अटळ आहे. लवकरच त्याबाबत आदेश जारी केले जाणार आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने पालांडे व शिंदे हे वसुलीचे काम पाहत होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठीचे दरही तेच निश्चित करीत असल्याचा आरोप सचिन वाझेने आपल्या जबाबात दिला आहे. त्याअनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सविस्तर चौकशी सुरू केली आहे. १ जुलैपर्यंत कोठडीत असल्याने त्यांच्याकडून अन्य धागेदोरे हाती लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असलेल्या पालांडे यांचे शासकीय सेवेतून निलंबन निश्चित झाले आहे. राज्य नागरी सेवा अधिनियमातील तरतुदीनुसार सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन अटळ असते. त्यामुळे लवकरच त्याबाबत आदेश जारी केले जातील.