लसीकरणापासून वंचित नागरिकांसाठी ‘संजीवनी आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:51+5:302021-06-01T04:06:51+5:30
ईशान्य मुंबईत नावीन्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत लसीकरण सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासदार मनोज कोटक यांनी ‘संजीवनी आपल्या दारी’ या ...
ईशान्य मुंबईत नावीन्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत लसीकरण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासदार मनोज कोटक यांनी ‘संजीवनी आपल्या दारी’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत ईशान्य मुंबई गृहसंकुलात लसीकरण शिबिरे आयोजित केली आहेत. याअंतर्गत लसीकरणापासून वंचित नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.
घाटकोपर येथे स्कायलाईन ओयासिस, नीलकंठ किंगडम, पारसधाम, मुलुंड येथे ॲटमॉस्फीअर, विलोस टॉवर, गोल्डन विलोस, रेडवूड/ सिल्व्हर ब्रिच, सिटी ऑफ जॉय या गृहसंकुलात ७ हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण आजपर्यंत पार पडले आहे. फोर्टिस, हिंदू सभा, साई व इतर रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकांमार्फत हे लसीकरण करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सीएट टायरच्या सर्व कामगारांच्या लसीकरणाची मोहीमही राबवली आहे.
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे लसींचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण बंद पडले आहे. अशावेळी या वयोगटाचे लसीकरण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी प्राधान्याने करण्यासाठी खासदार मनोज कोटक यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याच संकल्पनेने आणि पाठपुराव्याने मुंबई महानगरपालिकेने डोअर स्टेप व्हॅक्सिनेशनची पॉलिसी बनविली. परंतु पुरेसा लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अशावेळी खासदार कोटक यांनी रुग्णालयामार्फत गृहसंकुलात लसीकरण मोहीम राबविली. या शिबिरांमुळे महापालिका मोफत लसीकरण केंद्रांवरील गर्दी व ताण कमी झाल्यामुळे या विभागात समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना लसीकरण सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे.
संपूर्ण जून महिन्यात ईशान्य मुंबईतील तरुणांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून खासदार कोटक यांनी विविध गृहसंकुलांत दररोज लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे नियाेजन केले आहे. यामुळे लसींची उपलब्धता नसल्यामुळे लसीकरण होऊ न शकलेल्या नागरिकांनी विशेषतः तरुणांनी खासदार कोटक यांचे आभार मानले.
------------------------------------------------