Join us

अजितदादांना धक्का, मावळचा शिलेदार ठाकरेंच्या गळाला लागला; मातोश्रीवर पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 1:46 PM

सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं येतायेत. लाचारीसाठी काही जण तिथे गेलेत. तुमचा उत्साह मला सांगतोय. मला प्रचाराला येण्याची गरज नाही. लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात आज मावळ लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे समर्थक मानले जाणारे संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधलं आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ठाकरेंनी संजोग वाघेरे यांच्यासह आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत केले. हा काळ संघर्षाचा आहे.ज्यांच्यात भावूकपणा आहे ते भगव्याशी एकनिष्ठ आहेत. तर जे घाऊक आहेत ते सांगण्याची गरज नाही. त्यांना त्या खोक्यातच बंद करून टाकायचा आहे असा निशाणा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हापासून मावळ मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून शिवसेना तो जिंकत आलेला आहे. शिवसेनेकडे उमेदवार होते. पण आता ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केली. गद्दार आणि स्वाभिमानी यातला फरक संजोगमध्ये आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला. आमच्याकडे सत्ता नाही. सत्ता येणार यात दुमत नाही. सत्ता ज्यांनी हिसकावून घेतली, त्यांच्याकडून लोक जिथं सत्ता नाही तिथे येतायेत. सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं येतायेत. लाचारीसाठी काही जण तिथे गेलेत. तुमचा उत्साह मला सांगतोय. मला प्रचाराला येण्याची गरज नाही. लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल. प्रचाराला मी नक्की येणार. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे. रायगडमधील शिवसैनिकही माझ्यासोबत उभे आहेत. पिंपरी चिंचवड,मावळ इथून मोठी आघाडी आणायची आहे असं त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक कशी जिंकायची याची काळजी नाही.तुमचा उत्साह दांडगा आहे. विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. संजोग तुमच्यासोबत जे आलेत ते सगळे शिवसैनिकच झाले. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पुण्यात जन्माला आले तिथूनच गद्दारी गाडण्याची सुरुवात आपल्याला करायची आहे असं आवाहन ठाकरेंनी केले.  

तसेच संजोग वाघेंरेंना शिवबंधनात बांधून शिवसेना परिवारात सामावून घेतले आहे. शिवसेनेचा परिवार खूप मोठा आहे. आम्ही सगळेच शिवसेनेच्या बाबतीत भावूक असतो. आता आपल्याला लढायचे आहे. मावळ पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायची जबाबदारी आपल्यावर आहे. २०२३ मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा तेजाने उगवायचा आहे. शिवसेनेत कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक पदच मोठे असते. ज्या संख्येने, ताकदीने आपण आलाय ती ताकद पूर्ण मावळ, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वाढवणार आहे. केवळ लोकसभा नव्हे तर विधानसभा, ग्रामसभेपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करायचे आहे. संघर्षाच्या काळात तुम्ही आमच्यासोबत उभे राहिलात त्याबद्दल आपले आभारी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, माझी जबाबदारी, माझे कुटुंब याची सुरुवात केली तेव्हाच मी भावूक झालो होतो. संजय राऊत यांच्या माध्यमातून रोज सकाळी दिशा देण्याचं काम होते. देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना घडतायेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायचे हे आम्ही ठरवले. मी जेव्हा साहेबांना भेटलो ते मितभाषी आहेत. आज हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण द्याल ती जबाबदारी मी नक्कीच पार पाडेन अशी ग्वाही संजोग वाघेरेंनी पक्षप्रवेशावेळी दिली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअजित पवारसंजय राऊतएकनाथ शिंदे