Join us

मुंबईत विकसित संकल्प भारत यात्रा १६६ ठिकाणी पोहचली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 9:29 PM

१५ हजार ३८३ गरजू नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ

मुंबई:केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मुंबई महानगरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या २२७ प्रभागांमध्ये विशेष अशा चार वाहनांद्वारे केंद्र शासन पुरस्कृत योजनांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. पालिका क्षेत्राचा विचार करता मुंबई शहर जिल्ह्यात ५४, तर मुंबई उपनगरे जिल्ह्यात १६६ ठिकाणी अशा एकूण २२० ठिकाणी या यात्रेची माहिती देणारे रथ पोहोचले आहेत.  आपल्या परिसरात येणाऱ्या या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले  आहे.  

मुंबईत विकसित भारत संकल्प यात्रेची वाहने पोहोचतात तेथे नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येत असून आरोग्य तपासणी देखील केली जाते. त्यातील अनेकांना औषधांचेही वाटप होत आहे. या आरोग्य तपासणी दालनांद्वारे आतापर्यंत २९ हजार ४४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच १५ हजार ३८३ गरजू नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात आला. या यात्रेतूनच मुंबईकरांना आयुष्मान कार्ड वितरित केले जात आहे. आतापर्यंत १६ हजार नागरिकांना हे कार्ड वितरित करण्यात आले. यासह २ हजार ७३१ लाभार्थ्यांनी स्वनिधी योजनेचा, तर ५०८४ लाथार्थ्यांनी संकल्प योजनेचा लाभ घेतला आहे. आधारकार्ड शिबिरांना हजारो नागरिकांनी भेटी दिल्या असून, त्यांच्या विविध अडचणी या यात्रेद्वारे सोडवल्या आहेत. ही यात्रा मुंबई महानगराच्या ज्या भागात पोहोचते तेथे ‘खेलो इंडिया’ हे क्रीडा क्षेत्राशी निगडित असलेले दालन असते. या दालनालाही नागरिकांनी भेटी दिल्या आहेत. विविध योजनांची माहिती घेतली. याप्रमाणे सौभाग्य योजना, मुद्रा कर्ज योजना आणि स्टार्ट अप इंडिया योजनेचा लाभ नागरिकांना मिळाला आहे.------------यात्रेची उद्दिष्ट्ट्येमहानगरपालिका क्षेत्रातील विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे, त्याबाबत जागृती करणे, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेत आहेत.----------------या योजनांचा मिळतोय थेट लाभउज्ज्वला, पीएम स्वनिधी, खेलो इंडिया, स्वनिधी ते समृद्धी, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया, प्रधानमंत्री आवास, सौभाग्य, विश्वकर्मा आदी १७ प्रकारच्या योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी, योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’उपयुक्त ठरत असल्याचे महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालिका डॉ प्राची जांभेकर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई