Join us

संक्रांत ठरली अखेरची; पतंग उडवताना नारळाचे झाड पडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:14 AM

झाड अंगावर पडल्याने अनिरुद्ध गंभीर जखमी झाला होता.

मुंबई : मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी पतंग उडवताना अंगावर अचानक नारळाचे झाड पडल्याने अनिरुद्ध सुजीत मचाड (१३) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून सहार परिसरात शोककळा पसरली आहे. अनिरुद्ध सहार गावच्या रोझमेरी चाळीत आईवडील तसेच मोठ्या भावासह राहत होता.

अवर लेडी ऑफ हेल्थ स्कूलमध्ये तो आठवीत शिकत होता. त्याचे वडील सुजीत यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, तो सहारच्या चर्च पाखाडी परिसरात नेहमी खेळायला जात होता. गुरुवारीदेखील तो पतंग उडविण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. काही वेळाने एकच आरडाओरडा सुरू झाल्यावर स्थानिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. 

झाड अंगावर पडल्याने अनिरुद्ध गंभीर जखमी झाला होता. याबाबत आम्हाला समजले आणि तातडीने त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याने उपचारापूर्वीच जीव सोडला. याप्रकरणी सहार पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर ऐन संक्रांतीच्या दिवशी मचाड कुटुंबीयांवर मुलाला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे वर्ग 

झाडामुळे निष्पाप मुलाला जीव गमवावा लागला. याप्रकरणी विचारणा करण्याकरिता  ‘लोकमत’ने के/पूर्वचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी या घटनेबाबतचा सर्व अहवाल वरिष्ठ उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्याकडे वर्ग केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार परदेशी यांना दूरध्वनी आणि संदेशामार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही.

टॅग्स :मृत्यू