नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधन, खाद्यतेल तसेच वीज दरवाढीने डिसेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी डिसेंबर २०२१च्या किरकोळ महागाई दराची आकडेवारी प्रसिद्ध केली. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ४.०५ टक्के झाला. नोव्हेंबरमध्ये हाच दर १.८७ टक्के होता. खाद्यतेलाच्या किमती अजूनही चढ्याच आहेत. खाद्यतेलाच्या महागाई दरात तब्बल २४.३२ टक्के तर इंधन आणि विजेच्या महागाईमध्ये १०.९५ टक्के वाढ झाली आहे.
साबण, डिटर्जंट २० टक्के महागइलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊन काहीच दिवस झाले असताना आता सर्वांची रोजची गरज असलेले साबण, डिटर्जंटच्या खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागतील. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने हिंदुस्तान युनिलीव्हरने साबण आणि डिटर्जंट यांच्या किमतीमध्ये ३ टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
भाज्याही महागल्याभोगीमुळे भाज्यांचे दर व्यापाऱ्यांनी अचानक वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांवरच संक्रांत ओढवल्यासारखी स्थिती बुधवारी बाजारात होती. गाजर ८० ते १०० रुपये, कांदा पात एक पेेेंडी २० रुपये, मेथी १५ ते २० तर वांगी १०० ते १२० रुपये किलाेच्या दराने व्यापारी ग्राहकांना विकत होते.