‘रंगवल्ली’वर ‘संस्कार भारती’ची कुरघोडी
By Admin | Published: March 28, 2016 02:30 AM2016-03-28T02:30:15+5:302016-03-28T02:30:15+5:30
गुढीपाडव्यानिमित्त रंगवल्ली परिवारातर्फे गावदेवी मैदान येथे गेली १५ वर्षे अखंडपणे १५ हजार फूट क्षेत्रफळाची रांगोळी काढली जाते. मात्र, रंगवल्लीने यासाठी परवानगी काढण्याआधीच
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
गुढीपाडव्यानिमित्त रंगवल्ली परिवारातर्फे गावदेवी मैदान येथे गेली १५ वर्षे अखंडपणे १५ हजार फूट क्षेत्रफळाची रांगोळी काढली जाते. मात्र, रंगवल्लीने यासाठी परवानगी काढण्याआधीच ‘संस्कार भारती’ने परवानगी मिळवून कुरघोडी केली आहे. या रांगोळी काढण्याच्या प्रतिष्ठेत राजकीय रंग भरले जात असून विक्रम करणाऱ्या प्रतिभावंत कलावंतांची गळचेपी होत असल्याचे बोलले जात आहे.
नववर्ष उत्सवात रंगवल्ली परिवाराने १६ ते १८ हजार चौरस फुटांची रांगोळी काढण्याचा विक्रम केला आहे. ही रांगोळी चितारण्यासाठी ज्येष्ठ कलाकारदेखील दिवसरात्र मेहनत घेत असतात. दरवर्षी १० हजारांहून अधिक रसिक खास रांगोळी पाहण्यासाठी येतात. रसिकांना ही रांगोळी एका वेगळ्या पद्धतीने आणि नजरेत भरेल, अशा पद्धतीने पाहता यावी, यासाठी रंगवल्ली वेगळी सोयदेखील करत असते. रांगोळीचा व कलाकारांचा मिळून जवळपास अडीच लाखांचा खर्च ही संस्था करत असते. परंतु, यंदा रंगवल्ली परिवाराला या रांगोळीसाठी गावदेवी मैदान न मिळाल्यामुळे त्यांनी रांगोळी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या १५ वर्षांत प्रसिद्धीच्या झोतात चमकलेल्या रंगवल्ली परिवाराची रांगोळी एका वेगळ्या शिखरावर पोहोचली आहे आणि हीच प्रसिद्धी आड आली आहे. या रांगोळीला मिळणारी प्रसिद्धी पाहता यंदा रंगवल्ली परिवाराला मैदान मिळू नये, यासाठी चांगलेच राजकारण रंगले आहे. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या पदाधिकाऱ्यांना या रांगोळीची प्रसिद्धी पचनी न पडल्याने त्यांनीच हे कटकारस्थान रचल्याचे सांगितले जात आहे.
२० वर्षांपूर्वी संस्कार भारतीमध्ये वेद कट्टी हे रुजू झाले होते. रांगोळीचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. संस्थेला त्यांनी पाच वर्षांत अडीच लाखांचा निधीही जमवून दिला. परंतु, तेथील पदाधिकाऱ्यांना कट्टी यांचे काम खटकले व त्यांच्या कामावर निर्बंध आणण्यास सुरुवात केल्याने ते तेथून बाहेर पडले. २००१ साली त्यांनी रंगवल्लीची स्थापना केली व न्यासासोबत राहून गावदेवी मैदानात रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला न्यासाने त्यांना मदतदेखील केली. परंतु, जसे रांगोळीचे क्षेत्रफळ वाढत गेले, तसे प्रसिद्धिमाध्यमांनी या मोठ्या रांगोळीला प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे न्यासाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेची प्रसिद्धी कमी होत गेल्याने न्यासाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कट्टी यांना लहान रांगोळी काढण्यास निर्बंध आणले. परंतु, त्यांच्याकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी संस्थेतून काढता पाय घेतला व स्वतंत्रपणे रांगोळी काढण्यास सुरुवात केली. आजतागायत त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे.
ज्या वेळी आम्ही न्यासासोबत राहून रांगोळी काढत होतो, त्या वेळी त्यांच्याकडून एका रुपयाची अपेक्षा केली नव्हती. साधा वडापावदेखील आम्हाला देत नव्हते. त्यांच्याकडे कधीही आम्ही पैसे मागितले नाही. या रांगोळीचा खर्च रंगवल्ली परिवाराच्या वतीनेच केला जात असल्याचे कट्टी सांगतात. अनेकदा न्यासाला स्वागतयात्रेसाठी निधीदेखील जमा करून दिल्याचे कट्टी यांनी अधिक माहिती देताना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून रंगवल्ली परिवार आणि कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासामध्ये खदखदत असलेले वाद आता चव्हाट्यावर आले असून सांस्कृतिक क्षेत्रात आता वादाला नवे तोंड फुटले आहे.
रंगवल्ली परिवार साधारणत: नववर्षाच्या तीन महिने आधी रांगोळीची तयारी करत असतो. पण, यंदा मात्र संस्कार भारतीने नोव्हेंबरमध्येच मैदान आपल्या नावावर नोंदवून टाकले.
रंगवल्ली परिवाराला मैदान मिळू नये, यामागे काही राजकीय पक्षदेखील असल्याचे बोलले जात आहे. संस्कार भारतीतर्फेदेखील आकर्षक रांगोळी काढल्या जातात; मात्र त्यांच्या रांगोळ्या रंगवल्लीच्या तुलनेत छोट्या असतात. रांगोळीसारख्या विषयातही राजकारण रंगल्यामुळे रंगवल्ली परिवाराला गावदेवी मैदान मिळू शकलेले नाही.
नाट्यसंमेलनातही वेद कट्टी यांना मिळाली नाही जागा
नाट्यसंमेलनात रांगोळी दालन उभे करण्याची अभिनव संकल्पना वेद कट्टी यांनी मांडली होती. मात्र, आयत्या वेळी त्यांना जागा नाकारण्यात आल्याने नाट्यरसिकांना एक वेगळा आविष्कार पाहण्यासाठी मुकावे लागले होते.
मैदानाची परवानगी प्रभाग समितीस्तरावर दिली जाते. जो प्रथम परवानगी घेईल, त्याला ती प्राधान्याने दिली जाते. संस्कार भारतीने प्रथम अर्ज केल्याने त्यांना गावदेवी मैदानाची परवानगी देण्यात आलेली आहे.
- संदीप माळवी,
जनसंपर्क अधिकारी, ठामपा
न्यू इंग्लिश स्कूलचे काम सुरू आहे आणि गेली दोन वर्षे आम्ही तेथे रांगोळी काढत नाही. कारण, त्यांनी मैदान देणे बंद केले आहे. गेल्या दोन वर्षांत भगवती शाळेचे मैदान व श्रीराम व्यायामशाळेचे मैदान येथे आम्ही रांगोळी काढली होती. यंदा गावदेवी मैदान येथे १० हजार चौरस फुटांची रांगोळी काढली जाणार आहे. ठाणे महापालिकेला या मैदानासाठी चौकशी केली, तेव्हा त्यांनी अर्ज करण्यास सांगितले आणि आम्ही योग्य वेळेत अर्ज दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
- शमिका कुरुम्बट्टे,
सचिव, संस्कार भारती
यंदा आम्हाला मैदान मिळू नये म्हणून संस्कार भारतीने आधीच हे मैदान बुक केले. त्यामुळे यंदा आम्हाला मैदान मिळणार नसल्याने रांगोळी काढली जाणार नाही.
- वेद कट्टी, संस्थापक अध्यक्ष, रंगवल्ली परिवार