मुंबई : औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नावीन्यपूर्ण कल्पना तर मागवाच, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ते आज वर्षा येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलत होते.जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पैठणला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या ठिकाणी जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान जागतिक दर्जाचे उद्यान याठिकाणी बनले पाहिजे. यासाठी लोकांमधून तर चांगल्या नावीन्यपूर्ण कल्पना मागवा, असे त्यांनी जलसंपदा विभागाला सांगितले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमटीडीसीच्या ७ जागा विकसित करणे सुरू असून, संत ज्ञानेश्वर उद्यानासारखी मोठी जागा विकसित करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लगार असावा, अशी सूचना केली.
सौंदर्यीकरणासाठी ४० कोटींचा प्रस्ताव आता सुमारे २०० एकर जागेवर उद्यान आहे. सौंदर्यीकरणासाठी ४० कोटींचा प्रस्ताव केला आहे. या ठिकाणी वॉटर पार्क, खेळणी व प्राणिसंग्रहालय, थीम पार्क असे उभारण्याचे नियोजन आहे.