प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी घाटकोपर स्थानकावर आला सांताक्लॉज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:37 AM2019-12-24T03:37:41+5:302019-12-24T03:37:46+5:30
मुंबई : रेल्वे प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकात सोमवारी सांताक्लॉजचे आगमन झाले होते. रेल्वे पोलिसांतर्फे या उपक्रमाचे ...
मुंबई : रेल्वे प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकात सोमवारी सांताक्लॉजचे आगमन झाले होते. रेल्वे पोलिसांतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक हातात घेऊन सांताक्लॉज रेल्वे प्लेटफॉर्म, तसेच रेल्वे ब्रिजवर उभा होता. रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, नेहमी रेल्वे फूटओवरब्रिजचा उपयोग करा, रेल्वेमध्ये चढताना व उतरताना दरवाजाच्या डाव्या बाजूचा उपयोग करावा, दरवाजाला लटकून प्रवास करू नका, रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी १८२ क्रमांकावर फोन करावा. अशा घोषणा रेल्वे पोलिसांमार्फत देण्यात येत होत्या. रेल्वे सुरक्षेबाबत सांताक्लॉज जनजागृती करत असल्याने प्रवाशांचे लक्ष वेधले जात होते. यावेळी रेल्वेचे नियम न पाळल्यास कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते, याबद्दल प्रवाशांना माहिती देण्यात आली व योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
सांताक्लॉज म्हणतो, ‘पर्यावरण वाचवा’
मुंबई : नाताळची (ख्रिसमस) लगबग सुरू झाली आहे. सांताक्लॉज येणार व आपल्याला भेटवस्तू देणार, अशी आशा बाळगून लहान मुले त्या दिवसाची वाट पाहत आहेत आणि आता पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देणारी महिला सांताक्लॉज मुंबईच्या विविध झोपडपट्टी विभागात फिरणार आहे.
२६ डिसेंबर रोजी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना भेटवस्तू देण्यासाठी ग्रीन सांताक्लॉज स्नेहा मलीपेडी या अवतरणार आहे. स्नेहा या स्वत: ग्रीन सांताक्लॉजची वेशभूषा परिधान करणार आहेत. हा सांताक्लॉज भेटवस्तू देण्याबरोबरच ‘प्लास्टीकमुक्ती’चा संदेश देणार आहे.
ग्रीन सांताक्लॉज स्नेहा मलीपेडी म्हणाल्या की, मालाड ते ओशिवरापर्यंतच्या झोपडपट्टी विभागातील मुलांना भेटवस्तू आणि खाऊ दिला जाईल. यात चॉकलेट, शैक्षणिक साहित्य, खेळणी व खाऊ इत्यादी साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. वाहनाला पर्यावरणाच्या संदेशांनी सजविले जाणार आहे. यामध्ये ‘प्लास्टीकमुक्ती’, ‘पाणी वाचवा’, ‘इंधनाचा कमी वापर करा’ इत्यादी संदेश ग्रीन सांताक्लॉज नागरिकांना देणार आहे. साक्षर वेल्फेअर सोसायटीचे सौरभ जोशी आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटी यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात सहकार्य केले आहे.