सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 04:24 PM2020-11-10T16:24:31+5:302020-11-10T16:24:56+5:30
MMRDA News : अतिरिक्त कामांमुळे १०९ कोटींचा वाढीव खर्च
काम पूर्ण होण्यास तब्बल अडीच वर्षांचा विलंब
मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या आणि बीकेसीच्या भविष्यातील विस्तारासाठी अत्यावश्यक असलेल्या सांताक्रुझ चेंबुर लिंक रोडचे काम नोव्हेंबर, २०१६ मध्ये सुरू झाले. नियोजनानुसार हे काम नोव्हेंबर, २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या कामातील अडथळे आणि नियोजनात झालेल्या बदलांमुळे कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे या कामासाठी तब्बल १०९ कोटी रुपये जादा मोजावे लागणार असून काम पूर्ण होण्यासाठी आता मार्च, २०२२ उजाडणार आहे.
सांताक्रुझ चेंबुर जोड रस्त्यामध्ये वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी असा कुर्ला ते वाकोला पुलाला जोडणारा फ्लायओव्हर बांधणे आणि भारत डायमंड कंपनी, वांद्रे कुर्ला संकुल ते वाकोला जंक्शन असा दुसरा फ्लाय ओव्हर बांधणे या दोन पँकेजमधिल कामांचा समावेश आहे. या कामासाठी जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीची निवड झाल्यानंतर २७ नोव्हेंबर, २०१६ रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आला होता. त्यांना ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते. मात्र, आता ४८ महिने लोटले असले तरी पँकेज एक मधिल काम जेमतेम ५५ टक्केच पूर्ण झाल्याची माहिती हाती आली आहे. उर्वरित कामे करण्यासाठी आणखी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. कामाचा कार्यादेश दिला तेव्हा ४४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तो आता ५५८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्या वाढीव खर्चाला प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे.
रस्त्याच्या मध्यरेषेने वाढविला खर्च
मुंबई विद्यापिठाकडून रस्त्याची मध्यरेषा स्थलांतरत करण्यात आली आहे. त्यामुळे पाईल फाऊंडेशनची खोली वाढली, जल आणि मलनिःसारण वाहिन्यांचे स्थलांतर करावे लागले, डेकचे काम वाढले, पुलावरील वाकोला आर्मचे पानबाई इंटरनँशनल स्कूलपर्यंत विस्तारीकरण, केबल स्ट्रेसच्य सहाय्याने पोहोच मार्गाचे काम करावे लागले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही काही बदल सुचविले आहेत. त्याशिवाय मिठी नदि आणि हंसबुग्रा मार्गावरील पुलाचे कामही वाकोला उड्डाणपुलासोबतच करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या सर्व कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे.
विलंबाची कारणे
प्रकल्पातील अतिरिक्त कामे, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, वृक्षांचे स्थलांतर, जलवाहिन्या व मलनिःसारण वाहिन्यांचे स्थलांतर आदी कामांमध्ये बराच विलंब झाला. त्यामुळे कंत्राटदाराला हे काम करण्यासाठी ३१ मार्च, २०२२ पर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिका-यांनी दिली.