परवानगीअभावी रखडणार सांताक्रुझ झोपड्यांचे पुनर्वसन
By admin | Published: January 5, 2016 02:54 AM2016-01-05T02:54:40+5:302016-01-05T02:54:40+5:30
सांताक्रुझमधील नेहरूनगर व इंदिरा नगर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय करू नये, असा आदेश सोमावरी हायकोर्टाने विकासक ‘कॉसमॉस रिअॅल्टी’ला दिला.
मुंबई : सांताक्रुझमधील नेहरूनगर व इंदिरा नगर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय करू नये, असा आदेश सोमावरी हायकोर्टाने विकासक ‘कॉसमॉस रिअॅल्टी’ला दिला.
विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवर अतिक्रमण करून, नेहरूनगर व इंदिरा नगर या झोपडपट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. पुनर्वसन करण्यापूर्वी विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन थांबवण्यात यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका बाबुराव जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. विमानतळ प्राधिकरणाने जमीन त्यांची असल्याचे आणि पुनर्वसनासाठी परवानगी घेतली नसल्याचेही स्पष्ट केले. ‘कॉसमॉस रिअॅल्टी’नेही विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी घेतली नसल्याचे मान्य केले. त्यावर खंडपीठाने परवानगी घेतल्याशिवाय पुनर्वसन करू नका, असा आदेश विकासकाला दिला. (प्रतिनिधी)