सांताक्रुझमधील परिचारिका वसाहतीचे काम अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:38 AM2018-10-21T02:38:56+5:302018-10-21T02:38:59+5:30
सांताक्रुझ पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथील परिचारिका वसाहतीची दुरवस्था झाली होती.
मुंबई : सांताक्रुझ पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथील परिचारिका वसाहतीची दुरवस्था झाली होती. रहिवाशांच्या घरातील स्लॅब कोसळण्याच्या वारंवार घटना घडत होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने परिचारिका वसाहतीची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे.
परिचारिका वसाहतीची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे घरांच्या छताचा भाग कोसळणे, पावसाचे पाणी गळणे इत्यादी समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत स्थानिक रहिवासी मनोज देसाई यांनी सांगितले की, परिचारिका वसाहतीमध्ये भाभा, कूपर, व्ही. एन. देसाई आणि शताब्दी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका राहतात. इमारतीची स्थिती गंभीर झाल्याने दिवसेंदिवस समस्या वाढत होत्या. मात्र, महापालिकेकडून कामाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र आम्ही संपूर्ण इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित विभागाकडून इमारतीची बाहेरून डागडुजी केली जात आहे.
>वसाहतीची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती केलेली नव्हती. त्यामुळे छताचा भाग कोसळणे, पावसाचे पाणी गळणे इत्यादी समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, वसाहतीचे काम सुरू झाल्याने समाधानाची भावना रहिवाशांतून व्यक्त होत आहे.