Join us  

सांताक्रुझ : रहिवाशांना पुराची भीती; पावसाळा जवळ येऊनही मोठ्या नाल्यांच्या सफाईचा पत्ताच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:52 AM

सांताक्रुझ पश्चिमेतील खारदांडा आणि जुहू कोळीवाडा परिसराला संलग्न गजधारबांध ही संमिश्र मोठी झोपडपट्टी आहे.

- श्रीकांत जाधवलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हजारो इमारती तसेच वस्तीचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट समुद्रात मिळावे म्हणून सांताक्रुझ गजधर बांध येथील भर झोपडपट्टी परिसरात मोठे नाले समुद्राला जोडण्यात आले आहेत. या नाल्यातून भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वस्तीत येते. अशात या मोठ्या नाल्यांची पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप साफसफाई झालेली नसल्याने गजधर बांध येथील रहिवाशांना पुराची भीती सतावत आहे. या नाल्यांची सफाई झाली नाही, तर समुद्राचे पाणी आणि पावसाचे पाणी तुंबून पूर स्थिती निर्माण होते. 

सांताक्रुझ पश्चिमेतील खारदांडा आणि जुहू कोळीवाडा परिसराला संलग्न गजधारबांध ही संमिश्र मोठी झोपडपट्टी आहे. येथे समुद्राला मिळणारा मोठा खाडी नाला आहे. तो नाला झोपडपट्टीला लागून पुढे विलेपार्लेच्या दिशेने जातो. या नाल्याचे पात्र मोठे आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी वसाहतीत शिरते. अशात येथील मोठ्या नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली नाही. काही वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी झोपडपट्टीत किंवा इमारती भागात शिरू नये म्हणून येथे भिंत उभारण्यात आली. तरीही येथील मोठ्या नाल्यात प्रचंड गाळ आणि कचरा जमा आहे. येथील जमिनीचा बराच भाग सखल असल्याने येथे थोड्याशा पावसात पाणी तुंबते. 

  नालेसफाई झाली नाही तर इमारती परिसरातही पाणी तुंबते. हे पाणी झोपडपट्टी भागात शिरते. त्यामुळे येथील परिसरात नालेसफाईची आवश्यकता असते.   याबाबत पालिका एच पश्चिम प्रभाग अधिकाऱ्यांना विचारले असता अजून नालेसफाईचे काम सुरू आहे. येथील खाडी पात्राची साफसफाई सुरू आहे. मोठ्या नाल्यांचीही सफाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

भिंतीअभावी जिवाला धोका !गजधरबांध येथे ४ मोठे नाले आहेत, मात्र एकाचीही सफाई नाही. नाल्याला संरक्षक भिंतसुद्धा नाही. जेथे भिंत आहे तेथे उंची कमी असल्याने तरुण किंवा मुले नाल्यात पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकूणच नागरिकांच्या जिवाला धोका आहे. - भीम घाडगे, शिवसेना  गजधरबांध शाखाप्रमुख क्र. ९९

टॅग्स :पाऊस