सांताक्रूझ परिसराची ‘तुंबई’तून होणार सुटका; पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:02 AM2024-01-31T10:02:53+5:302024-01-31T10:05:18+5:30

मिठीलगतच्या जलवाहिन्यांच्या बांधकामासाठी २२ कोटी खर्च.

Santacruz area will be liberated from water logging in rainy season | सांताक्रूझ परिसराची ‘तुंबई’तून होणार सुटका; पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय

सांताक्रूझ परिसराची ‘तुंबई’तून होणार सुटका; पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय

मुंबई :  सांताक्रूझ पूर्व येथील सीएसटी रोड मार्गावर पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे सी.एस.टी. रोड, सुंदरनगर व आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर आता पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून सांताक्रूझमधील दानी कॉर्पोरेट पार्क ते मिठी नदी रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी अंदाजे २२ कोटी इतका खर्च येणार आहे. यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांतून पाण्याचा निचरा लवकर व सहज झाल्याने या भागात पाणी साचण्यापासून दिलासा मिळू शकणार आहे. 

मुंबईत सखल भागामध्ये पाणी साचून पाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीचे असले तरी पालिका यावर सातत्याने उपाययोजना करीत आहे. सध्या मुंबईत पाणी तुंबणारी जवळपास १२७ ठिकाणे असून, गेल्या एक ते दोन वर्षांच्या तुलनेत त्यात वाढही झाली आहे. त्यापैकीच सांताक्रूझ पूर्व परिसराच्या सी.एस.टी. रोड आणि आजूबाजूच्या परिसरात हा प्रकार दर पावसाळ्यात अनुभवण्यास मिळतो. 

 साचणाऱ्या पाण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व विभाग कार्यालयाकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतात. 

 या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खाते व विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

 या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिनी न बदलता त्यामध्ये दुरुस्त्या व बांधकाम करण्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून करण्यात आला आहे.

प्रवाह सुरळीत होणार :

पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होऊ शकणार आहे. पावसाळ्यात कंत्राटदाराने खर्चाने प्रवाहातील अडथळे दूर करणे, नाल्यातील गाळ काढणे, ही कामे करून प्रवाह सुरळीत ठेवला जाणार आहे. 

सी.एस.टी परिसरातील पाणी दानी पार्कच्या व्होलटेक्स नाल्यामार्गे मिठी नदीला जाऊन मिळते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदीला जाऊन मिळते; परंतु दानी व्होलटेक्स नाला अरुंद स्वरूपाचा आहे.

सी.एस.टी. रोडलगतच्या पर्जन्य जलवाहिन्या  :

काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या स्थितीत असून, त्यांची रुंदी व खोली अपुरी आहे व काही ठिकाणी उतार कमी- जास्त प्रमाणात आहे. सी.एस.टी. रोड, सुंदरनगर परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. 

Web Title: Santacruz area will be liberated from water logging in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.