मुंबई - शिवसेनेत मोठी बंडखोरी केल्यानंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर, शिवसेना कोणाची हा वादही जोरदार सुरू असून कायदेशीर लढाईत तो वाद अडकला आहे. त्यातही दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्यात कुठेही कमी पडत नाहीत. निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहतील. शिवसैनिक जोपर्यंत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख मानतात तोवर कुणालाही त्यांच्या पदाला हात लावण्याची हिंमत नाही, अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. आता, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२३ जानेवारी २०२३ रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे. ५ वर्षापूर्वी पक्षाच्या कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता या पदाची मुदत संपतेय. मात्र शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने सध्या पक्षांतर्गत निवडणुका घेणे ठाकरेंसमोर आव्हानात्मक आहे. त्यामुळेच, ठाकरे गट आता शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. या शक्तीप्रदर्शनावर टीका करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसेच, संताजी आणि धनाजी हे १८-अठरा तास काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
गेल्या अडीच वर्षात उध्दव ठाकरे सरकारने साधा पेनही चालवला नाही. त्यांच्या खिशातही पेन नव्हता आणि आमदारांच्या पत्रावर अठरा-अठरा महिने सह्या व्हायच्या नाही. अठरा-अठरा महिने मुख्यमंत्री मंत्रालयात यायचे नाही. जेव्हा तुमच्याजवळ होतं तेव्हा तुम्ही काही केल नाही. आता कितीही शक्तीप्रदर्शन केलं, तरी इकडे संताजी आणि धनाजी सारखे दोन सरदार आहेत. हे दोन सरदार अठरा-अठरा तास महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यामुळे कितीही शक्ती प्रदर्शन केलं आणि कितीही उड्या मारल्या तरी काही होणार नाही, अशा शब्दात बावनकुळे यांनी शिवसेनेला फटकारले. सरकारने राज्याला चांगलं राज्य सरकार दिलं आहे. या सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल, असेही त्यांनी पुढे म्हटले.
मोदींची शिवसेना म्हणा - अंधारे
मुख्यमंत्रीपद हवं आहे का हे विचारून एकनाथ शिंदेंचा अपमान करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवली या मंत्री दीपक केसरकरांच्या आरोपावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. मोदींची शिवसेना असलेल्यांनी बाळासाहेबांची शिवसेना असा उल्लेख करू नये असं त्यांनी म्हटलं.