Join us

Santosh Bangar Breaking: शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात, संतोष बांगर थेट शिंदेंच्या बसमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 10:42 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपानं जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.

मुंबई-

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपानं जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. यातच काल रात्री नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते असल्याचं मान्य केल्याचं पत्र जारी केलं. तसंच शिवसेनेकडून प्रतोदपदी नेमण्यात आलेल्या अजय चौधरी यांची निवड रद्द केली आणि शिंदे गटातील भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली आहे. यातच आज सकाळी शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाला आहे. 

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा संतोष बांगर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिंदे गटासोबत येण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. 

संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिंदे समर्थक गटातील शिवसेना आमदारांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, याच संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आपण कायमस्वरुपी उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी उभं राहणार असल्याचं सांगत मतदार संघात जाऊन जोरदार भाषण केलं होतं. तसंच मतदार संघातील शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना परतण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी ते भावूकही झाले होते. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदे