मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१६’ ची घोषणा करण्यात आली आहे.२०१६ सालचा ‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर (अॅथलेटिक्स) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. यंदाचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ युवक व युवती क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल, दत्तू भोकनळ नाशिक (नौकानयन) व अभिलाषा म्हात्रे, नवी मुंबई (कबड्डी) यांना, तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष गर्जे, बीड (वंचित मुलांसाठी शिक्षणाचे भरीव कार्य) व हेमलता तिवारी, मुंबई (मुंबईतील लोकलमध्ये गाणे गाऊन उपजीविका मिळविणाऱ्या २०० निराधार लोकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य) यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ युवक व युवती देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक व क्रीडा युवा पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे.महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे, तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणाऱ्या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे १८वे वर्ष आहे. या पुरस्कारांचे वितरण शनिवार १४ जानेवारी २०१७ रोजी बारामती येथे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे, कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
संतोष गर्जे, हेमलता तिवारी सामाजिक युवा पुरस्काराचे मानकरी
By admin | Published: January 09, 2017 4:44 AM