मुंबई : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार संतोष वारिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन सल्लागार आणि मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून वारिक कार्यरत आहेत.
राज्याच्या नगर विकास विभागाने या संदर्भातील अध्यादेश काढला असून, वारिक यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारून तसा अहवाला शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पदाचा कार्यभार यापूर्वी तत्कालीन मुंबई महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याकडे होता. संतोष वारिक यांना अग्नी प्रतिबंध आणि संरक्षणाच्या क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एमआयडीसी फायर सर्व्हिसेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी नागपूरच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून फायर इंजिनीअरिंग केले असून विधि आणि अर्थ या विषयात एमबीए केले आहे.