मुंबई : आर्थिक अडचणीत असतानाही महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड करण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी मान्य करीत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय महापालिकेनेे घेतला. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामार्फत सानुग्रह अनुदानाची रक्कम बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कामगार संघटनांची चर्चा झाल्यानंतर महापौरांनी सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केला. त्याप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही पालिकेच्या धर्तीवर यंदा दिवाळी बोनस जाहीर करण्याची मागणी बेस्टमधील कामगार संघटनांनी केली. लॉक डाऊन काळात बेस्टचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी कर्तव्यावर हजर होते. बेस्ट उपक्रमातील दोन हजारांवर कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला. यापैकी ५० कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजाविल्याने त्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळाला पाहिजे, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मंगळवारी संध्याकाळी महापौर आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्यामुळे बुधवारी महापौर स्वतः सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर करणार आहेत.
महापालिकेप्रमाणे बोनस देण्याची मागणी-बेस्ट उपक्रमात वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागात एकूण ४४ हजार कर्मचारी आहेत. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने दरवर्षी सानुग्रह अनुदानाचा विषय गाजतो. - गतवर्षी बेस्ट कामगारांना दिवाळीनंतर ९,१०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. यंदाच्या दिवाळीत बेस्ट कामगारांना पालिकेच्या धर्तीवर १५ हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.