मुंबई : बाळाचा जन्म हा आनंदाचा क्षण खरा पण तो आनंद साजरा करण्यासाठी कुलाब्यातील दुबे कुटुंबीयांना ११० दिवस वाट पाहावी लागली. मुदतपूर्व प्रसूतीमुळे नवजात बाळ कामा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवावे लागले, त्यात काही दिवस व्हेंटिलेटरवर व नंतर महिनाभर कृत्रिम प्राणवायूवर. जन्माच्यावेळी अवघे ८०० ग्रॅम वजन असणारे ते बाळ १०८ दिवसांनी १ किलो ८१६ ग्रॅमचे झाले, प्रकृती स्थिर झाली आणि त्या बाळाला व आईला डिस्चार्ज मिळाला अन् एका जीवनसंघर्षालाही विराम घेता आला. ज्यामुळे दुबे कुटुंबीयांना ही ‘सान्वी’ घरी नेता आली...
दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या ज्योती दुबे या २ मे रोजी सातवा महिना असताना नियमितपणे तपासणीसाठी कामा रुग्णालयात गेल्या. त्यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांनी बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसून बाळाची वाढ थांबली असल्याचे सांगून तत्काळ दाखल करून घेतले. त्यानंतर काही दिवसांत प्रसूती करावी लागल्याचे त्यांना सांगण्यात आले. १३ मे रोजी नैसर्गिक प्रसूती होऊन त्यांना मुलगी झाली. मात्र, या बाळाचे वजन कमी असल्यामुळे, फुप्फुस व्यवस्थित विकसित न झाल्यामुळे तिला स्वतःहून श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे या बाळाला पहिले १२ दिवस व्हेंटिलेटरवर व त्याच्या पुढे एक महिना कृत्रिम प्राणवायूसाठी ऑक्सिजन मशीनवर ठेवले होते.
कामा रुग्णालयामुळे सान्वी वाचली
ज्योती दुबे आपली मुलगी वाचण्याचे संपूर्ण श्रेय हे कामा रुग्णलायतील डॉक्टर आणि परिचारिकांना देतात. त्या सांगतात, ३० ऑगस्टला मला आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. २ सप्टेंबरला बाळाचे नाव घरी बारसे करून नाव सान्वी ठेवले. रुग्णालयातील प्रत्येक दिवस भीतीदायक होता. पण, सारे व्यवस्थित पार पडले.
हे बाळ फक्त मुदतपूर्व प्रसूतीने झालेले नाही, तर त्याला विविध आजारांनाही सामोरे जावे लागले आणि उपचारालाही त्याने प्रतिसाद दिला, तो सोपा नव्हता. बाळाची प्रकृती नाजूक होती, औषधोपचाराप्रमाणेच मानवी दुग्धपेढीतील दूध देण्यापासून तिच्या आईला कांगारू केअर देण्यापर्यंत (बाळाला ऊब मिळून वजन वाढावे म्हणून छातीवर बांधून फिरविणे) सगळ्या गोष्टी रुग्णालयात केल्या. रुग्णालयातील विविध टप्प्यांवरील प्रत्येकाने सहकार्य केले आहे. हे टीम वर्कचे यश आहे. - डॉ. श्रुती ढाले, बालरोगतज्ज्ञ, कामा रुग्णालय