देखाव्यातून साकारले सेनाभवन
By admin | Published: September 12, 2016 03:36 AM2016-09-12T03:36:19+5:302016-09-12T03:36:19+5:30
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर या मंडळाने यंदा ६८ व्या वर्षी शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘शिवसेना : काल-आज-उद्या’ या विषयावर आकर्षक देखावा
मुंबई : दहिसर (प.) येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर या मंडळाने यंदा ६८ व्या वर्षी शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘शिवसेना : काल-आज-उद्या’ या विषयावर आकर्षक देखावा साकारला आहे. यानिमित्त शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या सेनाभवनची हुबेहूब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या गेल्या ५० वर्षांतील यशस्वी वाटचालीची सजावट कल्पकतेने येथे साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी येथे गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
शिवसेनेचा झंझावात बाळासाहेबांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल जोमाने सुरु आहे. हा शिवसेनेचा गेल्या ५० वर्षांचा कालखंड येथील देखाव्यातून साकारल्याचे भालचंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
यंदा मंडळाचे ६८ वे वर्ष असून दरवर्षी मंडळातर्फे विविध प्रसिद्ध मंदिरांचे आकर्षक देखावे साकार केले जातात. विशेष म्हणजे दरवर्षी येथे २.५ फुटांची इको फ्रेंडली गणेशमूर्ती विराजमान होते. या मंडळाच्या देखाव्याला अनेक परितोषिके मिळाली आहेत. शिवसेनाप्रमुखांनीही येथील गणेशोत्सवाला भेट दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
मंडळाने गेली ६८ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच गरुजू नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, पालघर जिल्ह्यातील वाडा/ आंबिस्ते येथील दिगंबर पाडवी आश्रम शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप, देश-विदेशातील मनोरंजन कार्यक्रम पाहण्यासाठी मोफत रंगीत टीव्ही संच भेट असे सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी, नवरात्र, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती असे विविध उत्सव साजरे केले जातात. मंडळाला आकर्षक देखाव्यासाठी अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. (प्रतिनिधी)