मुंबई : सॅप-ईआरपी प्रणालीमुळे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज ऑनलाइन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाल्याचा दावा महावितरणने केला असून, त्यामुळे वेतन, भत्ते व इतर आनुषंगिक फायदे यासारख्या सेवा जलद मिळणार आहेत.
पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लेखा विभागासाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर मानव संसाधन विभागासाठी सॅप-ईआरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता प्रत्येक क्रिया एकाधिक प्रभाव देत असल्याने एकाधिक नोंदीची कामे टाळली जाणे शक्य आहे. प्रत्येक क्रिया स्वयंचलितपणे असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दावे वेळेवर मिळणार आहेत. मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यात येतो. यापूर्वी मानव संसाधन विभागामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीद्वारे कामकाज सुरू करण्यात आले होते. यामध्येही कामकाज वेगवान झाले. त्याहीपेक्षा अधिक वेगवान व बिनचूक असलेली सॅप-ईआरपी प्रणाली लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
ही प्रणाली लागू करण्यापूर्वी विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळव्यवस्थापन, पे-रोल, उच्चवेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या.