केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक - थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 06:24 AM2020-11-25T06:24:42+5:302020-11-25T06:24:56+5:30
थोरात म्हणाले, कोरोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही
मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले; परंतु केंद्राने मदत केलेली नाही. केंद्राचे पथकही दोन महिने झाले तरी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास आले नाही. केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले, कोरोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पहात रहावीत, असा टोला थोरात यांनी लगावला. तसेच मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. आम्ही पुढील चार वर्षाचा कार्यकाळ ही पूर्ण करू , असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.