Join us

सपना गिलला पोलिस कोठडी; पृथ्वी शॉचीही होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 8:03 AM

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण, दोन जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली भोजपुरी अभिनेत्री सपना गिल हिला शुक्रवारी अंधेरी कोर्टाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी आणखी  दोघांना अटक केली आहे. दरम्यान, विमानतळासारख्या संवेदनशील परिसरात हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी स्थानिक पोलिस काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला असून, व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वांद्रेत झाल्याची समजते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर पोलिस आयुक्तांच्या वांद्रे येथील कार्यालयात सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी ही बैठक घेतली. बैठकीत या घटनेचा आढावा घेत, सुरक्षेबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. शॉवर हल्ल्याचे सत्र हे सहारच्या डोमेस्टिक विमानतळ परिसरात सुरू झाले आणि  ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत येऊन थांबले. मुख्य म्हणजे, हा प्रकार घडला, त्यावेळी स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच कळविण्यात आले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिमंडळ ८ चे पोलिस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) सोबत पोलीस नव्हते, तसेच या घटनेची कोणतीही माहिती अथवा तक्रार आम्हाला देण्यात आली नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सपनाला तीन दिवसांची म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सपनावर कलम ३८७ वाढविण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन संशयितांना अटक केली असून, शॉकडेही चौकशी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शॉचीही होणार चौकशीहल्ला प्रकरणात पृथ्वी शॉ याचा मित्र आशिष यादव याने तक्रार दिली होती. त्यानंतर त्याने पुन्हा जबाब दिला. त्यामुळे नेमके काय घडले याची चौकशी शॉकडे करत जबाबात काही तफावत आहे का? नेमके काय घडले याची माहिती पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :पृथ्वी शॉमुंबई