नयनरम्य हिरवळीतला सेल्फी पॉइंट
By Admin | Published: February 13, 2016 03:36 AM2016-02-13T03:36:55+5:302016-02-13T03:36:55+5:30
सेल्फीसाठी आकर्षक बॅकग्राउंडच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला खास संधी चालून आली आहे़ समुद्रकिनारी जाऊन सेल्फीसाठी जीव धोक्यात घालण्याऐवजी
मुंबई : सेल्फीसाठी आकर्षक बॅकग्राउंडच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला खास संधी चालून आली आहे़ समुद्रकिनारी जाऊन सेल्फीसाठी जीव धोक्यात घालण्याऐवजी पाना-फुलांच्या सान्निध्यातच हा दिवस प्रेमी युगुलांना साजरा करता येणार आहे़ पालिकेतर्फे दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या झाडे, फुले, फळांच्या प्रदर्शनात असा खास सेल्फी पॉइंटच तयार करण्यात आला आहे़
महापालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन दरवर्षी भरविण्यात येते़ भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचे यंदाचे २१वे वर्ष आहे.मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले़ तीन दिवस हे प्रदर्शन खुले राहणार आहे़ विशेष म्हणजे रविवारी व्हेलेंटाईन्स डेला हे प्रदर्शन सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत विनाशुल्क खुले
राहील.
कल्पकता आणि नावीन्यामुळे या प्रदर्शनाविषयी दरवर्षी मुंबईकरांमध्ये उत्सुकता असते़ तरुणांमधील सेल्फीचे वाढते आकर्षण ध्यानात ठेवून खास सेल्फी पॉइंटच तयार करण्यात आला आहे़ बॅकग्राउंडला रंगीबेरंगी फुलांनी सजलेली बाग, हिरवळीचा गालीचा, फुललेल्या परड्या, झुलत्या परडीतील झाडांनी सजलेला हा सेल्फी पॉइंट मुंबईकरांसाठी खास आकर्षण ठरेल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे़ (प्रतिनिधी)