विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

By संजय घावरे | Published: October 19, 2023 08:29 PM2023-10-19T20:29:06+5:302023-10-19T20:30:00+5:30

ना वर्गणी, ना बॅनरबाजी; भक्तांनी दिलेल्या दानातून होते देवीची सेवा.

sapta devi mata in the sakhar chal revealed from the well in mumbai | विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

संजय घावरे, मुंबई - मुंबापुरीमधील देवींची काही मंदिरे प्रसिद्धीपासून दूर राहूनही भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. लोअर परळमधील गणपतराव कदम मार्गावरील साखर चाळीतील म्हणजेच जोडीया मेन्शनमधील मंदिरात वास करणारी 'सप्तदेवी माता' आजवर अनेकांच्या नवसाला पावली आहे. कोणाकडूनही वर्गणी न घेता, तसेच राजकारण्यांची बॅनरबाजी न करता इथे मोठ्या भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

साखर चाळ १ ते १०च्या आवारात सप्तदेवी मातेचे मंदिर आहे. १९७५मध्ये साखर चाळ ९ आणि १०च्या मध्यभागी एक विहिर होती. तिथेच बाजूला राहणाऱ्या एका भक्ताच्या स्वप्नात कायम देवी यायची आणि माझी सुटका करा असे सांगायची. भक्ताला झालेल्या साक्षात्कारानंतर रहिवाशांनी विहिर उपसली. त्यातून सप्तदेवीची तेजोमय मूर्ती प्रगटली आणि सर्वांनाच आश्चर्य झाले. तिथे यशवंत जैतापकर नावाचे रहिवासी उभे होते. त्यांच्या हातात मूर्ती दिली गेली. त्यानंतर जैतापकर यांना काहीच समजले नाही. त्यांची पावले चालू लागली आणि आज जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन थांबली. तिथे केवळ चार वीटांवर मूर्तीची स्थापना करण्यात आली. तो दिवस होता ७ मे १९७५... त्यानंतर देवीचे पुढे काय करायचे असा सर्वांना प्रश्न पडला. त्यावर मातेने दृष्टांत दिला की, जशी आहे तशीच मला राहू द्या. माझ्यासाठी वर्गणी काढू नका. त्यामुळे कोणाकडूनही एक रुपयाही वर्गणी न घेता दान पेटीत जमा होणाऱ्या पैशांतून नवरात्रोत्सवापासून देवीची वर्षभर सेवा केली जाते. कालांतराने तिथे मंदिर बांधण्यात आले. या कामी बबन उमरजकर, विजय नर, बाळाराम मोहिते, भिकाजी गुरव, प्रभाकर नार्वेकर, भिकाजी नारकर आदी बुजुर्गांचे सहकार्य लाभले. 

सुवासिनींच्या हस्ते घटस्थापना...

सप्तदेवी मातेने दिलेल्या दृष्टांतानुसार सुवासिनींच्या हातून घटस्थापना केली जाते. माळ सोडली जात नाही. सुवासिनींनी मानवलेल्या ओटीचीच घटस्थापना केली जाते. नवरात्रोत्सवात अष्टमीला सप्तशतीचे पठण आणि होमहवन केला जातो. भजनाचा कार्यक्रम होतो. १०० किलोंपेक्षा जास्त तांदूळ जमा होतात. त्याचा आणि ओटीतील नारळांचा महाप्रसादासाठी वापर केला जातो. उरलेले नारळ, साड्या, ब्लाऊज पिसेसचा लिलाव न करता भक्तांना मोफत वाटल्या जातात.

अष्टमीला किरणोत्सव...

देवीचे मंदिर चहूबाजूंनी बंदिस्त असून, त्यावर पत्र्याची शेडही आहे. सूर्याची किरणे मूर्तीपर्यंत पोहोचणे अशक्य असूनही अष्टमीला देवीच्या मूर्तीवर चरणापासून मस्तकापर्यंत सूर्यकिरणांचा वर्षाव होतो. अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप हे रहस्य उलगडलेले नाही.

मे महिन्यात भव्य कार्यक्रम...

इथे कॅार्पोरेट आॅफिसेसमधील लोकांपासून सर्वसामान्यांपर्यंत बरेच जण मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर मातेला वस्तू अर्पण करतात. स्थानिक आमदारांनी १० हजार आणि बॅनर दिले होते, पण ते साभार परत केल्याचे स्मिता नार्वेकर-नाईक यांनी सांगितले. देवी प्रगटल्यास ८ मे २०२४ रोजी ५० वर्षे पूर्ण होणार असल्याने भव्य कार्यक्रम होणार आहे.

Web Title: sapta devi mata in the sakhar chal revealed from the well in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.