‘चला, वाचू या' अभिवाचन उपक्रमाची सप्तपदी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:05 AM2021-06-23T04:05:17+5:302021-06-23T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोणताही उपक्रम प्रायोगिक स्तरावर राबवायचा म्हणजे त्यात तन, मन, धन अर्पण करावे लागते. असे अनेक उपक्रम ...

Saptapadi of 'Let's read' campaign ...! | ‘चला, वाचू या' अभिवाचन उपक्रमाची सप्तपदी...!

‘चला, वाचू या' अभिवाचन उपक्रमाची सप्तपदी...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोणताही उपक्रम प्रायोगिक स्तरावर राबवायचा म्हणजे त्यात तन, मन, धन अर्पण करावे लागते. असे अनेक उपक्रम उत्साहात सुरू होतात आणि अकस्मात बंदही पडतात. या पार्श्वभूमीवर, ‘चला, वाचू या’ या अभिवाचनाच्या उपक्रमाचे यश ठळकपणे दिसून येते. प्रायोगिक तत्त्वावर मुहूर्तमेढ रोवलेल्या या उपक्रमाने आता सातव्या वर्षात पाऊल टाकत, वाचनसंस्कृतीशी जुळवलेला बंध अधिक घट्ट केला आहे.

‘व्हिजन’ या संस्थेच्या ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचा २१ जून २०१५ रोजी अभिनेते व कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि पुढे या छोट्याशा उपक्रमाचे एका चळवळीत रूपांतर झाले. रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या या उपक्रमात नाट्य, चित्रपट, कला, संगीत, अशा क्षेत्रांतील अनेक रंगकर्मींनी सहभाग घेत अभिवाचनाचा वसा जोपासला. जयंत सावरकर, सोनाली कुलकर्णी, विजय केंकरे, प्रशांत दामले, स्पृहा जोशी, डॉ. गिरीश ओक, सलील कुलकर्णी या व अशा अनेकांनी यात अभिवाचक म्हणून ‘एन्ट्री’ घेतली आहे.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे तत्कालीन प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ प्राप्त झाले. मुंबईत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे सन २०१८ मध्ये पुण्यातही ‘चला, वाचू या’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.

दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबईच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये होणारा हा उपक्रम. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्ष ऑनलाइन माध्यमातून घेतला जात आहे. आतापर्यंत २७५ कलावंत आणि १५ संस्थांनी या उपक्रमात अभिवाचन केले आहे. या जून महिन्यात या चळवळीचा वर्धापन दिन आणि ७५ वे पुष्प, असा एकत्रित मोठा कार्यक्रम करण्याचा या संस्थेचा मानस होता. मात्र, सध्याच्या एकूणच निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.

चौकट :

सर्वांच्या सहकार्यानेच वाटचाल

सर्वांच्या सदिच्छा आणि सहकार्यामुळेच हा अव्यापारेषू व्यापार आम्ही आतापर्यंत न थकता करू शकलो आहोत. याप्रसंगी डॉ. उत्कर्षा बिर्जे आणि रत्नाकर मतकरी यांची आठवण येणे साहजिकच आहे. ही चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि ती सर्वदूर पोहोचविण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

-श्रीनिवास नार्वेकर, उपक्रमाचे सर्वेसर्वा व रंगकर्मी

Web Title: Saptapadi of 'Let's read' campaign ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.