मुंबई: कोरोना कालावधीत सातत्याने चढ्या दराने सोने विकले गेले. मात्र त्याच काळात लग्नसराई असल्याने ग्राहकांच्या देखील सोन्यावर उड्या पडल्या. विशेष म्हणजे गणेशोत्सवात सोन्याने चांगली कमाई केली. आणि आता तर कोरोना गेल्याने सराफ बाजार सोने विक्रीबाबत अधिक सकारात्मक झाला आहे. त्यामुळे येत्या दसरा आणि दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक सोन्याची खरेदी होईल, असा दावा सराफ बाजाराने केला आहे.
केवळ दिवाळी नाही तर त्यादरम्यान सुरु होणारी लग्नसराई देखील यास कारणीभूत असेल, असेही सराफांकडून सांगण्यात आले. वसुबारस आणि धनत्रयोदशीला सराफ बाजारात चांगला ट्रेड पाहण्यास मिळतो. २०२० मध्ये वसुबारस आणि धनत्रोयदशी या दोन्ही दिवशी मिळून मुंबईच्या सराफ बाजारात तब्बल ७५० कोटीची सोने खरेदी झाली. उत्सव काळात लग्नसराई आहे. यावर्षी जास्त मुहूर्त आहेत.
नोव्हेंबरपासून जुलैच्या मध्यापर्यंत मुहूर्त आहेत. सरकारने कोरोनाचे निर्बंध हटविल्याने ग्राहक त्याचा लाभ घेतील. रशिया युक्रेन युद्ध झाले तेव्हा ४८ हजारावर सोने होते. नंतर हा भाव ५५ हजार झाला. त्यानंतर ५२ हजार झाला. चढउतार सुरुच असतात. तरीही सोन्याला मागणी कायम असते. सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा ५२ हजार ५०० रुपये आहे. दिवाळीमध्ये सोन्याचा भाव ५५ हजारांच्या आसपास जाईल.