Join us

सराईत घरफोडे गजाआड

By admin | Published: July 21, 2014 1:36 AM

भरदिवसा बंद घरे फोडणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींकडून काही दागिने आणि रोख रक्कम असा १० लाखांचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला आहे

मुंबई : भरदिवसा बंद घरे फोडणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींकडून काही दागिने आणि रोख रक्कम असा १० लाखांचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींनी गेल्या तीन वर्षांत तब्बल ३५ घरफोड्या केल्या आहेत.गेल्या तीन ते चार वर्षांपासून जुहू, अंधेरी, घाटकोपर बोरिवली, वर्सोवा, चेंबूर, दादर तसेच नवी मुंबई आणि ठाण्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. घरफोडीनंतर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले तरी घरफोडे मात्र हाती लागत नव्हते. दरम्यान, चेंबूरच्या कलेक्टर कॉलनी परिसरात दोन सराईत आरोपी घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांना शनिवारी मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकासह या परिसरात सापळा रचून परशुराम शेंडगे (३१) आणि दीपक पतंगे (२०) या संशयितांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे आढळली. त्यांच्याकडे चौकशी केली असता गेल्या तीन वर्षांत त्यांनी तब्बल ३५ घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. २००१ मध्ये परशुरामवर पहिला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. (प्रतिनिधी)