मुंबई : इमातीतील बंद घरात घुसलेल्या २७वर्षीय लुटारूने घरात सापडलेले अवघे १ हजार रुपये चोरी करून पळ काढल्याची घटना भांडुपमध्ये घडली. मात्र सतर्क शेजारी आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या लुटारूला जेरबंद केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एस वॉर्डमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून नोकरी करीत असलेले प्रमोद कांदळगावकर हे भांडुप पूर्वेकडील हरिश्चंद्र कोपरकर मार्गावर असलेल्या विजय को-आॅप. हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होते. मात्र इमारतीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून ते कुटुंबासोबत मुलुंड पूर्वेकडील एमएमआरडीए वसाहतीत वास्तव्यास आहेत. भांडुपमधील इमारतीतील फ्लॅट बंद असल्याची संधी साधून शुक्रवारी सकाळी लुटारू कांदळगावकर यांच्या घरात घुसला. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देत लुटारूला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र लुटारू त्यांच्या हातातून निसटला. तोपर्यंत याची वर्दी मिळताच पोहोचलेल्या कांजूरमार्ग पोलिसांनी येथील शुभकामना सोसायटीजवळून ताब्यात घेतले.कांदळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नीलेश विश्वास गुजर (२७) याला १ हजार रुपयांच्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुजर हा दिवा येथील रहिवासी असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो सराईत घरफोड्या असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
सराईत घरफोड्या गजाआड
By admin | Published: October 12, 2016 5:07 AM