ठाणे : ओवळा माजिवाडयाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ४८ तासातच चौकशी करावी, असे आव्हान सरनाईक यांनी पोलिसांना दिले होते. आता ४८ तास उलटले असले तरी या पार्श्वभूमीवर पोलिसांनी युद्धपातळीवर या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आतापर्यन्त ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सात ते आठ जणांची चौकशी केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. पांडेंच्या खासगी वहिवाटीच्या रस्त्यापर्यन्त सरनाईक गेल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांनी पैशांची मागणी केली की नाही, याबाबतचा तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.सरनाईकांनी जरी ४८ तासातच तपास करावा, अशी मागणी केली असली तरी या गुंतागुतीच्या आणि तांत्रिक तसेच महत्वाच्या प्रकरणाचा इतक्या कमी वेळात तपास करणे अवघड असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नितिन बंगाळे यांनी ‘लोकमत’ला सागितले. शहरात डेंग्यू तसेच साथीच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे गांधीनगर भागाचा पाहणी दौरा ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केल्याचे सरनाईक यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले. या भागातील अनधिकृत बांधकामे, ट्रान्सिस्ट कॅम्प आदींच्या पाहणीसाठी ज्या पालिका अधिकाऱ्यांना सरनाईकांनी बोलविले होते. त्यांचीही खातरजमा करण्यात आली आहे. संजय पांडे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे सरनाईक हे त्यांच्या कार्यालयात गेले होते. तर आपण त्यांच्या कार्यालयात नव्हे तर पांडे यांची खासगी वहिवाट असलेल्या रस्त्यावरुन २९ आॅक्टोंबर रोजी गेल्याचे सरनाईक यांनी मान्य केले आहे.मात्र, स्वत: पांडे आणि सरनाईक यांची भेटही झालेली नाही. व्यवस्थापक ओमप्रकाश मिश्रा यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केल्याचा पांडेंचा आरोप असला तरी त्याबाबतचाही अधिकृत कोणताही दुवा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सरनाईक यांनी आदल्या दिवशी २८ आॅक्टोंबर रोजी पालिका अधिकाऱ्यांची घेतलेली अपॉन्टमेंट त्यांच्याबरोबर गेलेले अधिकारी आणि नागरिकांनी परिसरातील नागरी असुविधांबाबत केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाचा तपास कोणत्याही निष्कर्षापर्यन्त आलेला नसल्याचेही बंगाळे यांनी सांगितले.
सरनाईक प्रकरणी ७ जणांची चौकशी
By admin | Published: November 04, 2014 11:52 PM