मुंबई - एकीकडे बॉलिवूडपासून ते टॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचविरोधात आपला आवाज उठवत आहेत. कास्टिंग काऊचसंदर्भात रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टिंग काऊचसंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे.
सरोज खान यांनी कास्टिंग काऊचचे समर्थन करणारे विधान केल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ''कास्टिंग काऊच म्हणजे काही नवीन बाब नाही. ही गोष्ट तर बाबा आदमच्या काळापासून चालत आली आहे. प्रत्येक मुलीवर कोणी-ना-कोणी हात साफ करण्याचा प्रयत्न करतंच. सरकारी कार्यालयातही महिला सुरक्षित नाहीत, तर मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्याच हात धुवून मागे का लागले आहात?. असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचे झाले तरी तिला काम मिळतं. बलात्कार करुन तिला सोडून दिलं जात नाही. आता मुलीला काय हवंय, हे सर्व काही तिच्यावर अवलंबून असते. शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांच्या हाती लागायचे नसेल तर येथे येऊ नका. जर तुमच्याकडे कला आहे तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला विकण्याची आवश्यकता नाही'', असे वादग्रस्त विधान करत सरोज खान यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. सरोज खान आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
दरम्यान, वादावर पडदा पडावा, यासाठी त्यांनी सारवासारव करत माफी मागितली आहे.