गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली; तिघांना अटक, एक जण पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:15 AM2023-10-27T06:15:29+5:302023-10-27T06:16:27+5:30
तिघांनी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची तोडफोड केली. एकाने त्याचे चित्रीकरणही केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची गुरुवारी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, तर रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती पसार झाली असून भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी मंगेश साबळे (२५) हे सरपंच आहेत.
क्रिस्टल टॉवरमध्ये सदावर्ते राहतात. वाहन रस्त्याकडेला पार्क करतात. गुरुवारी सकाळी एका कारमधून आलेल्या तिघांनी घोषणा देत सदावर्ते यांच्या कारची तोडफोड केली, तसेच एकाने त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर व्हिडीओ करणारी व्यक्ती पसार झाली.
पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मंगेश साबळे (२५), वसंत शामराव बनसोडे (३२) आणि राजू साठे (३२) या तिघांना ताब्यात घेतले. तिघांनाही भोईवाडा पोलिस ठाण्यात आणले. तिघांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, हत्यारबंदी कायद्याचे उल्लंघन, सार्वजनिक शांततेचा भंग आणि तोडफोडप्रकरणी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.
मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. साबळे यांनी याआधी सप्टेंबरमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत स्वतःच्या गाडीवर पेट्रोल टाकून मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला होता.