Join us

‘ग्रामविकास’ माध्यमातून भाजपचे शक्तिप्रदर्शन, फडणवीस, मुंडेंच्या उपस्थितीत सरपंच मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:23 AM

सरपंचांची मोठी ताकद सरकारच्या व पर्यायाने भाजपच्या पाठीशी उभी असल्याबाबतचे शक्तिप्रदर्शन ३१ जुलै रोजी शिर्डी येथे करण्यात येणार आहे.

मुंबई : सरपंचांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अलिकडे घेतल्यानंतर सरपंचांची मोठी ताकद सरकारच्या व पर्यायाने भाजपच्या पाठीशी उभी असल्याबाबतचे शक्तिप्रदर्शन ३१ जुलै रोजी शिर्डी येथे करण्यात येणार आहे. त्या दिवशी राज्यातील ४० हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.पूर्वी सरपंचांना एक हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळत असे. अलिकडेच फडणवीस सरकारने हे मानधन पाच हजार रुपये केले. ३१ तारखेच्या मेळाव्यात राज्य सरपंच परिषदेच्या वतीने या बाबत सरकारचे आभार मानण्यासाठी फडणवीस आणि मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. एकीकडे शिवसेनेने पीक विम्याच्या प्रश्नाला हात घालून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे भाजपने राज्यातील सरपंचांना मानधनवाढ आणि मेळाव्याच्या निमित्ताने गोंजारले आहे. यापूर्वी २००३ मध्ये सरपंचांचा राज्यव्यापी मेळावा झाला होता. आता तब्बल १६ वर्षांनंतर असा मेळावा होत आहे.सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेले काही महिने जिल्हास्तरावर सरपंच मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २६ जिल्ह्यांमध्ये असे मेळावे झाले. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की या मेळाव्यांच्या नियोजनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील प्रमुख व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरपंच, उपसरपंचांची ताकद भाजपच्या पाठीशी मेळाव्यांच्या निमित्ताने उभी केली जात आहे.>ठोस घोषणेची अपेक्षाग्रामविकास क्षेत्रातील नामवंतांचे मार्गदर्शन, सरपंचांचे मनोगत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप असे या मेळाव्याचे स्वरुप असेल.प्रयोगशील सरपंचांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या मेळाव्यात मुख्यमंत्री ग्राम पंचायतींसाठी काही ठोस घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :पंकजा मुंडेदेवेंद्र फडणवीस