Join us

मेट्रो चारच्या कारशेडचीही ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 6:40 PM

Metro carshed : कांजूर कारशेडच्या अनिश्चिततेचे

मुंबई : आरे काँलनी येथील मेट्रो तीनचे कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर वडाळा – गायमूख या मेट्रो चारचे कारशेडही मोगरपाड्यातून कांजूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. आता कांजूरच्या कारशेडवर अनिश्चिततेच्या भोव-यात सापडल्यानंतर मेट्रो चारच्या कारशेडला पुन्हा यू टर्न घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत. एमएमआरडीएच्या धरसोड वृत्तमुळे मेट्रो चारची ही ससोहोलपट सुरू आहे.

वडाळा ते कासरवडवली (मेट्रो – ४) आणि कासरवडवली ते गायमूख (४ अ) या मार्गावरील मेट्रोसाठी कारशेड उभारणीचे प्रयत्न गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी सर्वप्रथम ओवळा येथील जागा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांचा विरोध, त्याला मिळालेले राजकीय नेत्यांचे पाठबळ आणि आर्थिक व्यववहार्यतेच्या मुद्यावर एमएमआरडीएने हा पर्याय बाजूला ठेवला. त्यानंतर मोगरपाडा येथील ४२ एकर जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आले. मात्र, तिथेही स्थानिक आणि पर्यावरणप्रेर्मींचा विरोध असून सरकारी यंत्रणांना इथल्या जागेचे मोजमापसुध्दा करू दिले जात नाही. पर्यावरणाच्या मुद्यावर मेट्रो तीनची कारशेड कांजूरला स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर मेट्रो चारची कारशेडसुध्दा तिथेच होईल असे एमएमआरडीएने स्पष्ट केले होते. त्यामुळे मेट्रो चारच्या मोगरपाडा येथील कारशेडच्या कामांसाठी काढलेल्या निविदांची प्रक्रियासुध्दा थांबविण्यात आली होती.

न्यायालयाने कांजूरची जागा हस्तांतरणा-या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिथे सुरू केलेल्या कामाला स्थगिती दिल्यानंतर केवळ मेट्रो तीनच नव्हे तर मेट्रो चारचे कारशेडही अडचणीच सापडले आहे. मेट्रो तीनसाठी बीकेसी येथील बुलेट ट्रेनची जागा देण्याचा पर्याय पूढे करून सरकारने राजकीय खेळी सुरू केली आहे. मात्र, त्या ठिकाणी मेट्रो चारचे कारशेड करणे अशक्य आहे. त्यामुळे कांजूरमार्ग नसेल तर मेट्रो चारसाठी पुन्हा मोगरपाड्याचा पर्याय स्वीकारण्याशिवाय एमएमआरडीएला पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. कांजूरच्या जागेबाबतचा न्यायालयीचा अंतिम निर्णय काय होते हे कळल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल असे अधिका-यांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :एमएमआरडीएमुंबईमेट्रो