मुंबई : पुणे येथील ससून रुग्णालयात गैरकृत्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काही दिवसापूर्वीच या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे दिला होता. मात्र ससून रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाताची गरज असल्याने आता ससून रुग्णालयाला नवीन अधिष्ठाता मिळणार असून त्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घोषणा केली जाणार आहे.
पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्तनमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सुद्धा सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले कि, " डॉ म्हस्के यांच्याकडे दोन मोठ्या रुग्णालयाचा कार्यभार होता. दोन्ही ठिकाणचा कार्यभार सांभाळताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ससून रुग्णालयाला नवीन अधिष्ठाता देण्यात येणार आहे. दोन ते तीन प्राध्यापकांची नावे सचिव आणि आयुक्तांनी निवडली आहे. त्यापैकी एकाला ससूनचा कार्यभार दिला जाईल. "