ससून लायब्ररीचे मूळ वैभव पुन्हा नव्याने अनुभवता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:31 AM2023-06-03T07:31:27+5:302023-06-03T07:31:38+5:30
जेएसडब्ल्यू आणि आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे पुनर्स्थापना
मुंबई : दुर्मीळ पुस्तकांचा खजिना आणि दगडी भिंतीसह अप्रतिम बाह्यरचनेमुळे जुन्या मुंबईचे सौंदर्यस्थळ असलेल्या डेव्हिड ससून लायब्ररी पुनर्स्थापित करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांच्या हस्ते तिच्या विश्वस्तांकडे शुक्रवारी लायब्ररीचे हस्तांतर करण्यात आले. जेएसडब्ल्यू आणि आयसीआयसीआय फाउंडेशनने लायब्ररी पुनर्स्थापित केली आहे. त्यामुळे वाचकांना सुसज्ज अशी डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूमचे मूळ वैभव परत अनुभवता येणार आहे.
जेएसडब्ल्यू समूहाने काळाघोडा येथील डेव्हिड ससून लायब्ररीचे पुनर्स्थापना जतनीकरण काम १६ महिन्यांच्या विक्रमी वेळात पूर्ण केले आहे. या पुनर्स्थापना प्रकल्पाची संकल्पना व श्रेय जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांचे आहे. देशातील अग्रगण्य जतनीकरण वास्तुविशारद आभा नरेन लांबा यांच्या सहयोगाने हे काम करण्यात आले. मुंबईतील बगदादी ज्यू व्यापारी डेव्हिड ससून यांनी दिलेल्या देणगीतून या इमारतीचे बांधकाम १८६७ मध्ये केले होते.
ही लायब्ररी म्हणजे शहराच्या ज्यू वारशामधील एक महत्त्वाचा घटक आहे. जागतिक वारसास्थळांमधील, व्हिक्टोरियन गोथिक व आर्ट डेको ऑन्सेम्बल्समधील सर्वांत पुरातन शिक्षणसंस्थांपैकी एक आहे. या प्रकल्पात आयसीआयसीआय फाउंडेशन, हर्मीस, काला घोडा असोसिएशन, मुंबईतील इस्रायलचे कॉन्सुलेट जनरल, एमके टाटा ट्रस्ट आणि अन्य काहींशी भागीदारी करून, पुनर्स्थापन प्रकल्पासाठी निधी उभा करण्यात आला. आभा नरेन लांबा, शशांक मेहंदळे, आर्किटेक्ट अनिल पाटील, सावनी हेरिटेज, केएकके लायटिंग, कांचन पुरी शेट्टी आणि पिलर प्लस यांच्या समन्वयातून हे काम झाले.
यावेळी आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुजिव ग्रोथचे अध्यक्ष संजय दत्ता, डेव्हिड ससून लायब्ररी आणि रीडिंग रूम समितीचे अध्यक्ष हेमंत भालेकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जुन्या वाचकांनी गर्दी केली होती.
पुनर्स्थापित लायब्ररीची ठळक वैशिष्ट्ये
लायब्ररीत पुस्तकांची मूळ रचना, उतरते छप्पर, दर्शनी भाग व अंतर्गत जागांची ऐतिहासिक बारकाव्यांचे जतन.
इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी व कन्नड अशा पाच भाषांतील ३० हजार पुस्तकांचा समावेश.
रीडिंग रूमच्या पहिल्या मजल्यावरील बुलशेल्फ मध्ये पुस्तके रचण्यात आली आहेत.
बुलशेल्व्ह्ज १८७० मध्ये इमारतीसाठी देण्यात आले होते.
अभिजात दगडी बाह्यरचना व अप्रतिम अंतर्गत रचनेची पुनर्स्थापना
मूळ मिण्टन टाइल फ्लोअरिंची पुनर्निर्मिती
ऐतिहासिक फर्निचरची पुनर्स्थापना
पुनर्निर्मित मूळ प्रकाश रचना वारसा इमारतींचे विस्तृत वॉटरप्रूफिंग