Join us

स्टेनलेस स्टील उद्योगसमूहाला जीएसटीमध्ये भेडसावणाऱ्या समस्या सोडवू- मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 8:19 PM

वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे स्टेनलेस स्टील उद्योगाला भेडसावणारे प्रश्न जे कायद्याच्या चौकटीत राहून सोडवता येतील ते सोडवण्याचा अर्थमंत्री म्हणून आपण नक्की प्रयत्न करू, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

मुंबई, दि. 26 - वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे स्टेनलेस स्टील उद्योगाला भेडसावणारे प्रश्न जे कायद्याच्या चौकटीत राहून सोडवता येतील ते सोडवण्याचा अर्थमंत्री म्हणून आपण नक्की प्रयत्न करू, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आज स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनच्या 60व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मितेश भागंडिया यांच्यासह अतुल शहा, जिंदाल उद्योगसमूहाचे अभ्युदय जिंदाल आणि स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनचे देशभरातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टेनलेस स्टील उद्योगाचा थेट संबंध किचन अर्थात स्वयंपाक घराशी येत असल्याने घराघरात समृद्धीचा आनंद देणारा हा उद्योग आहे, असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या व्यवसायाला असणारी स्थानिक बाजारपेठ खूप मोठी आहे. बर्तन के बिना परिवार, स्टील के बिना संसार चालत नाही. असोसिएशनची मागणी लक्षात घेऊन चमचांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले.

हे शासन देशाचा सन्मान वाढवण्यासाठी, देशाच्या लोकांच्या सन्मानासाठी काम करणारे शासन असून सरकार या शब्दात सर्व्हिस अर्थात सेवा हा अर्थ अभिप्रेत आहे. जॉब आणि सर्व्हिसमध्ये हाच फरक आहे. जॉब कामाशी तर सर्व्हिस सेवेशी संबंधित शब्द आहे. त्याअर्थाने जनतेची सेवा करताना या उद्योगाचेही घराघरातील योगदान खूप मोठे आहे, असे ते म्हणाले. स्वत: कष्ट करून पैसे कमावणे आणि ते स्वत:वर खर्च करणे हा स्वभाव आहे, स्वत: कष्ट न करता दुसऱ्यांच्या पैशावर नजर ठेवून काम करणे ही विकृती तर स्वत: कमवलेल्या पैशातून इतरांवर काही पैसे खर्च करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्याच्या मागे हजारो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असतात हे लक्षात घेऊन आपण चांगलं काम करत राहणं गरजेचे असते, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.