Join us  

मास्क सक्ती करणाऱ्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य सचिवांनी केली कानउघाडणी, सक्ती घेतली तत्काळ मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 1:25 PM

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सातारा जिल्ह्यात लागू केलेली मास्क सक्ती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अंगलट आली आहे. मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांत प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकरवी कानउघाडणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांना मास्क सक्ती तत्काळ मागे घ्यावी लागली.देशभरात साथ नियंत्रण कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना काही अधिकार दिले जातात. याच नियमाचा वापर करत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मास्क सक्तीचे आदेश आपल्या स्तरावर जाहीर केले. या आदेशांमुळे नागरिकांची मोठी अडचण झाली. मास्क न घालता गेल्यास सरकारी कार्यालयात त्यांना प्रवेश मिळेनासा झाला. त्यात खुद्द मुख्यमंत्रीच सातारा जिल्ह्याचे असल्याने ही तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली.त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अशी परस्पर मास्क सक्ती कशी जाहीर केली, अशी विचारणा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली. त्यानंतर सूत्रे हलली आणि मुख्य सचिवांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच संपर्क केला. अशा प्रकारे मास्क सक्ती करता येणार नाही, त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच तुम्हाला घेता येतो, असे या जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आले. यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवस साताऱ्यात लागू असलेली मास्क सक्ती अखेर मागे घेण्यात आली.

आदेश दिले नव्हते आवाहन केले हाेतेमास्क सक्तीचे कोणतेही आदेश दिले नव्हते. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केले होते, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले आहे.

टॅग्स :सातारा परिसरजिल्हाधिकारीकोरोना वायरस बातम्या