Join us

Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभेचा तिढा सुटणार! शशिकांत शिंदे, सारंग पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 2:45 PM

Satara Lok Sabha Election 2024 : आज शरद पवार गटातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, यात सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होऊ शकतो.

Satara Lok Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)' गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि सारंग पाटील यांनी 'सिल्वर ओक' निवासस्थानी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर

सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला आहे, तर आता श्रीनिवास पाटील यांनी चिरंजीव सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे बोलले जात आहे. तर पक्षाने उमेदवारी दिली तर शशिकांत शिंदे यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. 

"आज सातारा माढा या मतदारसंघाची चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो. संभाव्य उमेदवारांच्या यादीवरही चर्चा झाली. आता पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेईल, जो निर्णय घेतला जाईल त्या उमेदवारासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, असंही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार साहेबांना आम्ही सातारा लोकसभेसाठी आग्रह केला होता, पण त्यांनी नकार दिला आहे, असंही शिंदे म्हणाले. 

आज राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. या यादीत सातारा लोकसभेचा उमेदवारही जाहीर  होणार असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपाकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार

आरोग्याचं कारण देत खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. 

खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे आता नव्या उमेदवाराची घोषणा पवार करणार आहेत. दोन दिवसात नव्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.  'राष्ट्रवादी'( शरदचंद्र पवार) पक्षातून आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४सातारा