Join us

निमहान्स उभारणार महाराष्ट्रात सॅटेलाइट केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:50 AM

देशात मानसिक आजारावर संशोधन करणारी एकमेव संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ (निमहान्स) या संस्थेने महाराष्ट्रात सॅटेलाइट केंद्र उघडण्यास तत्त्वत: मान्यता दिली

मुंबई : देशात मानसिक आजारावर संशोधन करणारी एकमेव संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ (निमहान्स) या संस्थेने महाराष्ट्रात सॅटेलाइट केंद्र उघडण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. तर, ठाणे येथील मनोरुग्णालयाचे आधुनिकीकरण व उपचारांसाठी निमहान्स सल्लागार म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.बंगळुरू येथील निमहान्स या संस्थेला आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली. या भेटीनंतर माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, देशात मानसिक आजारासंबंधी संशोधन करणारी निमहान्स ही एकमेव संस्था आहे. मानसिक स्वास्थ्यासंबंधी वाढत असलेले आजार व जागृती विचारात घेता महाराष्ट्रातही या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगळुरू येथे जाऊन केंद्राची पाहणी केली. महाराष्ट्रात या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू झाल्यास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनाही फायदा होणार आहे. सॅटेलाइट केंद्राबाबत निमहान्सने सकारात्मकता दर्शविली असून याबाबत केंद्राकडे पाठपुरावाही करणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात मेमरी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय झाला असून या मेमरी क्लिनिकमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रशिक्षण देण्यासाठी निमहान्स संस्था पुढाकार घेणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचे मोड्युल तयार करण्याची तयारी या संस्थेने दर्शवली आहे.राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. ही कमतरता लक्षात घेता आता राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मानसिक आजार व त्यासंबंधीचे उपचाराचे विशेष प्रशिक्षण या राष्ट्रीय केंद्राकडून देण्याबाबत आजच्या दौºयात चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.