मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठ्ये महाविद्यालयात १६ ते १७ डिसेंबर रोजी दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साठ्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग महोत्सवासाठी सज्ज झाला आहे.
‘युवकांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडावी तसेच समस्या निराकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले विचार अभिव्यक्त करावे,’ या परिवर्तनवादी विचारांना समर्पित असलेला उत्सव म्हणजेच ‘जाणीव’ हा आंतरमहाविद्यालयीन सामाजिक महोत्सव.यंदाचा महोत्सव ‘युवा : बदलाची सुरुवात माझ्यापासून’ या मध्यवर्ती संकल्पनेद्वारे विविध स्पर्धांच्या माध्यमातून विचारमंथन व परिवर्तन घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे.
राष्ट्र आणि पर्यायाने विश्वाला प्रगतिपथावर नेण्याचे अफाट सामर्थ्य केवळ तरुणांमध्ये असते. तरी युवकांसमोर आज विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी महोत्सवात पथनाट्य, भित्तिपत्रक व घोषवाक्य, वक्तृत्व, समूहनृत्य, ओपन माइक अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना आपले विचार अभिनव पद्धतीने मांडण्यासाठी विचारमंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र हे या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.
युवकांच्या समस्या, समाज माध्यम, नशामुक्त समाज, शैक्षणिक असमानता, वयाआधी वयात येणे अशा अनेक सामाजिक समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करावी. ‘चला... सहभागी होऊ या ! कारण... बदलाची सुरुवात माझ्यापासून’ असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. तसेच दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाने दिली.
मुंबई, ठाणे, पालघर येथील कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहाभागी होत असताना़ या वर्षीही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कार्यक्रम अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.