Join us  

साठे महामंडळ घोटाळा : रमेश कदम यांची शाही बडदास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:53 AM

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांना सीआयडीकडून चौकशीच्या नावाखाली चांगलाच ‘पाहुणचार’ मिळाला.

- लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांना सीआयडीकडून चौकशीच्या नावाखाली चांगलाच ‘पाहुणचार’ मिळाला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व संचालक यांनी मोबाईलवरून दिलेल्या आदेशावरून महामंडळाच्या बीड कार्यालयातील ५ व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढल्याचे प्रकरण २०१५ मध्ये समोर आले होते. या प्रकरणी ९ मे २०१५ रोजी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तत्कालीन व्यवस्थापक घोटमुकले, नेटके, लिपीक श्रावण हातागळे, सचिन कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच आरोपाखाली आ. रमेश कदम यांना मंगळवारी रात्री पुण्याच्या सीआयडी अधिकाऱ्यांनी बीडमध्ये चौकशीसाठी आणले होते.मात्र, आ. कदम यांना कोठडीत न ठेवता मंगळवारी रात्रभर शासकीय विश्रामगृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली. बुधवारी दुपारी न्या. बी.व्ही. वाघ यांच्यासमोर सुनावणीला झाली. सीआयडीने आ. कदम यांच्या कोठडीची मागणी केली, तर आ. कदम यांनी स्वत:च युक्तीवाद करून आपली बाजू मांडली. मात्र, न्यायालयाने सीआयडीची मागणी ग्राह्य धरून कदम यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली. अशी केली व्यवस्थाशासकीय विश्रामगृहात आ. कदम यांची चोख बडदास्त ठेवण्यात आली होती. मात्र पत्रकारांची कुणकुण लागताच सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. तेथेही त्यांची ‘व्यवस्था’ करण्यासाठीे कार्यकर्ते सज्ज होते. विश्रामगृहातील काही सूट सीआयडी पुणे आणि आ. रमेश कदम यांच्या नावे बूक केले होते. मात्र, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आल्याचे पाहून रजिस्टरमधून आ. कदम यांचे नाव खोडण्यात आले.