कुणी हसलं, कुणी उदास बसलं; देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्या दिवशी घडलं तरी काय..?

By अतुल कुलकर्णी | Published: June 5, 2022 08:26 AM2022-06-05T08:26:02+5:302022-06-06T17:44:56+5:30

Devendra Fadnavis : वांद्र्याच्या घरी गेलं की पोहे खायला मिळतात, असं सगळे नेते सांगतात... तुमच्याकडे आता हल्ली नेते येण्याचं प्रमाण वाढलं आहे..!

Satire : What happened at Devendra Fadnavis's house ..? | कुणी हसलं, कुणी उदास बसलं; देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्या दिवशी घडलं तरी काय..?

कुणी हसलं, कुणी उदास बसलं; देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्या दिवशी घडलं तरी काय..?

Next

- अतुल कुलकर्णी

प्रिय देवेंद्रभाऊ, 
नमस्कार.
काल सगळे नेते आपल्या घरी जमले होते. आपलं चहापान झालं. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि बातम्या बाहेर आम्हाला बघायला, ऐकायला मिळाल्या. फोटोमध्ये आपण सगळे हसत खेळत गप्पा मारताना दिसत होतात. आपल्यात काय गप्पा झाल्या..? कोणत्या विषयावर आपण मतांचं आदानप्रदान केलं..? यावर राज्यभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणी म्हणालं, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही गेलो होतो... कोणी म्हणालं, आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेलो होतो... खूप दिवसांनी फोटोत दिसलेले खा. अनिल देसाई, शिवसेनेशिवाय भाजपचं कसं चाललंय... विचारायला आले होते म्हणे...? शिवसेनेमध्ये तुम्ही कोणत्या कॅबिनेटमध्ये मोडता..? किचन कॅबिनेट, की वर्षा कॅबिनेट...? की अन्य कोणतं वेगळं कॅबिनेट आहे का..? असा थेट सवाल तुम्ही त्यांना विचारला म्हणे... असा प्रश्न केलाच असेल तर त्यांनी काय उत्तर दिलं..? तुम्हा सगळ्यांच्या त्या हसऱ्या बोलक्या फोटोत दडलेल्या मौनाची सगळ्या राज्याला जाम उत्सुकता लागली आहे... त्या दिवशी आपल्या घरी घडलं तरी काय...?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे वेगवेगळे अनुभव कथन केले आणि त्यामुळे हास्यांचे कारंजे फुलले, अशीही चर्चा होती... नेमके कोणते अनुभव त्यांनी सांगितले..? नाशकात त्यांनी त्या महाराजांनी जसा माइक उचलला तसा माइक उचलून दाखवला म्हणे... हे कळताच अजितदादांनीसुद्धा पिंपरी-चिंचवडमध्ये भाषण करता-करता माइक उचलून दाखवला... याचाही किस्सा भुजबळांनी हसून-हसून सांगितल्याची बाहेर चर्चा आहे...! नागपूरचे आपले सख्खे शेजारी, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना एकदम भारी वाटलं म्हणं... अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना वगळून सुनीलभाऊंना आपल्याकडे चर्चेसाठी पाठवण्यात आलं. त्यामुळे आपल्याकडे काय चर्चा झाली, यापेक्षा सुनीलभाऊंना तिकडे कसं पाठवलं...? याचीच चर्चा काँग्रेसमध्ये जोरात सुरू झाल्याचं वृत्त आहे. छापून टाकायचं का असं...?

तुम्ही चंद्रकांतदादांना बोलावलं... त्यामुळे ते जाम खूश झाले आहेत. मागे पहाटेच्या शपथविधीला तुम्ही त्यांना बोलावलं नव्हतं... आजच्या चर्चेला बोलावल्यामुळे ते हसतमुखाने आपल्या घरातून बाहेर पडले... गाडीत बसले... आणि नीट कडेकडे शिस्तीत कोल्हापूरला गेले, अशी बातमी प्रसाद लाडांनी नंतर लाडेलाडे त्यांच्या आवडीच्या पत्रकारांना सांगितली म्हणे... नेमकं तुम्ही दादांना काय सांगितलं...? त्यामुळे ते एवढ्या खुशीत पुण्याला न थांबता थेट कोल्हापुरात गेले...? वाटेत त्यांनी अमितभाईंना फोन करून तुमच्याविषयी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, असं त्यांचा ड्रायव्हर प्रवीण दरेकर यांच्या ड्रायव्हरला सांगत होता म्हणे...

अनिल बोंडे यांनी गेल्या काही महिन्यांत जी काही अभ्यासपूर्ण विधानं केली... समाज जोडणाऱ्या कृती केल्या... त्यामुळे त्यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली का..? असा प्रश्न आपल्या बैठकीत कोणी केला का..? केला असेल तर आपण काय उत्तर दिलं..? कारण असं वागलं की राज्यसभा मिळते, असा जोरदार संदेश आपल्या पक्षात गेला आहे..! त्यामुळे आता सगळेच तसं वागू लागले तर किती जणांना राज्यसभा देणार, असा प्रश्न पंकजाताई समर्थक विचारत असल्याची माहिती हाती आली आहे...

वांद्र्याच्या घरी गेलं की पोहे खायला मिळतात, असं सगळे नेते सांगतात... तुमच्याकडे आता हल्ली नेते येण्याचं प्रमाण वाढलं आहे..! तेव्हा तुम्हीदेखील एखादी डिश लोकप्रिय करायला हरकत नाही... वांद्र्याचे नुसते पोहे तर तुमचे ‘तर्री विथ पोहे’, अशी डिश तुम्ही आता लोकप्रिय करायला पाहिजे... जेणेकरून चर्चा जरी खुमासदार झाली नाही तरी बाहेर पडणारे नेते पोह्यावरची तर्री भारी होती, असं म्हणत बाहेर पडतील... हा आमचा न विचारता दिलेला फुकटचा सल्ला... तुम्हाला ढोकळे, खांडवी असे पदार्थ द्यायचे असतील तर जरूर द्या...! 

पण या सगळ्यात तुम्ही काय बोललात हे कोणीच सांगायला तयार नाही... सगळे जण आपल्या मनाने त्यांना जे वाटत होतं ते सांगत होते. देवेंद्रभाऊंनी असा शब्द दिला, किंवा असा शब्द दिला नाही, असं ठोसपणे कोणीच काही बोललं नाही... त्यामुळे आता आमचं लक्ष दहा तारखेकडे आहे. जाता जाता एक बातमी देतो. आपले उमेदवार धनंजय महाडिक भाजप कार्यालयात प्रचंड तणावात आणि उदासवाणे बसल्याचं काही जणांनी पाहिलं... लढणाऱ्याने असं उदास बसणं योग्य नाही... त्यांना सांगता आलं तर बघा... 

- आपलाच
बाबूराव

Web Title: Satire : What happened at Devendra Fadnavis's house ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.