मुंबापुरीच्या वाईट हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक उंचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:15 AM2020-06-06T01:15:28+5:302020-06-06T01:15:31+5:30
माझगाव, बीकेसी, अंधेरी, चेंबूरमध्ये सुधारणा : हवेतील धूलिकणांचे प्रमाण १५० पार्टिक्युलेट मॅटरहून आले थेट ५० वर
सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईमधील जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण घटल्याचा दावा केला जात आहे. विशेषत: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मुंबई महापालिकेनेही वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत तयार केलेला वायुप्रदूषण पातळीबाबतचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषित ठिकाणांची हवादेखील समाधानकारक नोंदविण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने जानेवारी ते मे या महिन्यांदरम्यानच्या हवेची गुणवत्तेची पातळी मोजली आहे. चेंबूर, भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरीवली येथील हवेची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या सर्व ठिकाणी हवेत तरंगणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण १५० पार्टिक्युलेट मॅटरच्या आसपास होते. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण मे महिन्यात थेट ५० पार्टिक्युलेट मॅटर एवढे खाली घसरले. याचाच अर्थ मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला होता.
जानेवारी महिन्यात मुंबईच्या बहुतांशी भागात हवेचा दर्जा वाईट, अतिशय वाईट आणि मध्यम नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यातदेखील सरासरी प्रमाण हेच राहिले.
मार्च महिनादेखील हवेच्या गुणवत्तेच्या दर्जाबाबत निराशाजनकच राहिला. एप्रिलमध्ये मात्र हवेचा दर्जा सुधारू लागला. बहुतांशी ठिकाणी म्हणजे भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, माझगाव येथे हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला.
मे महिन्यातदेखील याच ठिकाणी हवेचा दर्जा मध्यम, समाधानकारक राहिला.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईच्या हद्दीत स्थिर वायू सर्वेक्षण केंद्रामार्फत विविध ठिकाणी वायू सर्वेक्षणाचे काम केले जाते. क्षेपणभूमी आणि वाहतूक नाक्यावरील वायुप्रदूषणाचे मोजमाप स्वयंचलित वाहनामार्फत केले जाते. नागरिकांच्या प्रदूषणविषयक तक्रारीनुसार विशेष सर्वेक्षण करून तक्रारीचे निवारण करण्यात येते. १९७६ सालापासून सुरू असलेल्या प्रयोगशाळेत वायू सर्वेक्षणाचे काम केले जाते.
बांधकाम क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे बंद असल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. मागील दहा वर्षांचा विचार करता वातावरण प्रदूषणवाढीस मोठ्या प्रमाणावर जबाबदार असलेले बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवले तर प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.